Join us

धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राधानगरीत उरले किती पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 5:13 PM

राधानगरी धरणात सध्या ६१.०३ टक्के म्हणजे १३४.२५ दलघमी पाणीसाठा शिल्लक असून, गेल्यावर्षी याच दिवसांमध्ये धरणात १३६.४६ दलघमी ( ४.८२ टीएमसी) पाणीसाठा होता. यंदाही जवळपास ४.७४ टीएमसी साठा आहे.

धरणांचा तालुका म्हणून राधानगरीची ओळख आहे. तालुक्यात असणाऱ्या तीन धरणांमुळे कोल्हापूर जिल्हा सुजलाम् सुफलाम् झाला. महाराष्ट्रातील अतिशय भक्कम जलाशय म्हणून राधानगरी धरण ओळखले जाते.

राधानगरी धरणात सध्या ६१.०३ टक्के म्हणजे १३४.२५ दलघमी पाणीसाठा शिल्लक असून, गेल्यावर्षी याच दिवसांमध्ये धरणात १३६.४६ दलघमी (४.८२ टीएमसी) पाणीसाठा होता. यंदाही जवळपास ४.७४ टीएमसी साठा आहे.

उन्हाळ्यामध्ये सलग पंधरा दिवस राधानगरी धरणातून ८०० ते १००० क्युसेक पाणी भोगावती नदीपात्रात सोडले जाते. हे धरण कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदान असून, शेतीसह पिण्याचे पाणीसुद्धा याच धरणातून वापरले जाते. आता कोल्हापूरला काळम्मावाडी धरणातूनही पाणी पोहोचणार आहे.

तालुक्यातील असणारे तुळसी जलाशय धामोड खोऱ्यातील शेतीची तहान भागवते. यामुळे धामोड नदीकाठाची गावे आर्थिकदृष्ट्या सबळ झाली आहेत. तालुक्यातील धरणांमुळे आजवर पाणीटंचाई जाणवली नसली तरी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वाढत असलेल्या तापमानामुळे पाणीसाठा कमी होऊ शकतो. त्यामुळे जपून पाणी वापरावे लागणार आहे.

काळम्मावाडी (दूधगंगा) धरणात ५१.८३ टक्के तर तुळसी जलाशयात ६६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शिल्लक असणारा पाणीसाठा तीन महिने पुरणारा असला तरी जपून वापरावा लागणार आहे.

अलीकडे वाढत असलेल्या तापमानामुळे राधानगरी तालुक्यात पावसाचे प्रमाण पूर्वीपेक्षा खूपच कमी झाले आहे. गतवर्षीप्रमाणे जर जून महिना कोरडा गेला तर पाणीटंचाई जाणवणार आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. तरीही तीन महिने कडक उन्हाचे असल्याने पाणी जपून वापरावे लागेल. सध्या उपसाबंदी केली जात नाही, त्यामुळे शेतीला पाणीटंचाई भासणार नाही. - प्रवीण पारकर, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे राधानगरी

टॅग्स :धरणपाणीमहाराष्ट्रराधानगरीकोल्हापूर