Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

By मुक्ता सरदेशमुख | Updated: July 22, 2023 16:07 IST

राज्यात पावसाचा जाेर वाढत असताना पुढील तीन तासात काही जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यात उत्तर ...

राज्यात पावसाचा जाेर वाढत असताना पुढील तीन तासात काही जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यात उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, धुळे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात पावसासची शक्यता आहे. तसेच विदर्भातील अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, गोंदिया, अकोला या जिल्ह्यांमध्येही अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज कोकण घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होत आहे. जळगाव, बुलढाणा जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र असून विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आनंदनगर तांडा येथे पुरात साधारण ४५ लाेक अडकल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर बचावासाठी पोहोचतील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून सांगितले. जिल्ह्यात अनेक भागात पाणी शिरले असून नागरिकांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

   

काय आहे भारतीय हवामान विभागाचा अलर्ट? 

येत्या चार ते पाच दिवसात कोकण घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. आज पुणे, सातारा, ठाणे, रायगड, आणि पालघर जिल्हयात तर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाडा, विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

येत्या २४ तासात कोकण किनारपट्टीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते असाही इशारा देण्यात आला असून उत्तर किनारपट्टी परिसरातील मच्छिमारांना अतिमुसळधार पावसामुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. येत्या पाच दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. त्यामुळे २१ ते २३ जुलै दरम्यान राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण घाटमाथ्यावर, मध्य महाराष्ट्रात, विदर्भात व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. 

टॅग्स :मोसमी पावसाचा अंदाजपाऊसपूरमहाराष्ट्रमोसमी पाऊसशेतकरीजंगल