Join us

मराठवाड्यात पावसाचे थैमान, हिंगोलीत कयाधू नदीला पूर, पुढील २४ तास महत्वाचे, हवामान विभागाचा अलर्ट काय?  

By मुक्ता सरदेशमुख | Updated: July 19, 2023 20:10 IST

राज्यात विविध भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक भागात नदी नाल्यांना पूर आला आहे.  

राज्यात विविध भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक भागात नदी नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी ७१.३० मिमी पावसाची नोंद झाली असून कयाधू नदीला पूर आला आहे. जिल्ह्यातील ओढे, नाले भरून वाहू लागल्याचे चित्र आहे. 

मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी  रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु असून पुढील २४ तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या २४ तासात ७१.३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

हिंगोलीत मुसळधार पाऊस 

राज्यात बहुतांश भागात पाऊस पडत असून पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत.  हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर  पाऊस झाला आहे. तर काही भागात अतिवृष्टी झाली आहे.   हिंगोली शहरासह कळमनुरी, वरुड, डोंगरकडा, जवळापांचाळ, आखाडा बाळापूर, डिग्रस कन्हाळे, वारंगाफाटा, शिरडशहापूर, औंढा नागनाथ, कुरुदा, जवळा बाजार, कौठा आदी भागांमध्ये दुपारभर पावसाची रिपरिप सुरूच होती. 

हवामान विभागाचा अलर्ट 

हवामान विभागाने आज राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला असून बहुतांश ठिकाणी ऑरेंज आणि येलो अलर्टही देण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड आणि पालघर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर, मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातही  पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. 

मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लातूर, पंढरपूर, अहमदनगर, सोलापूर, धाराशिव येथे पावसाची संततधार सुरू आहे. विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला असून वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी राहणार आहे.  अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी, ठाणे आणि मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी  करण्यात आला आहे. 

टॅग्स :मोसमी पावसाचा अंदाजमराठवाडापाऊसहिंगोलीपूरहवामानमोसमी पाऊसमहाराष्ट्र