राज्यात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. मान्सूनच्या इतिहासात मागील ३५ वर्षांमध्ये पहिल्यांदाच मान्सूनचा पाऊस लवकर दाखल झाला आहे. मे महिन्याच्या मध्यापासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती परंतु आता मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने शेतकरी सुखावला आहे.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १९९० साली कोकणात सर्वात लवकर म्हणजेच २३ मे रोजी मान्सूनचा पाऊस दाखल झाला होता. त्या अगोदरचा जर विचार केला तर १९६२ साली २९ मे रोजी मुंबईत मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर यंदा म्हणजेच २०२५ साली २५ मे रोजी महाराष्ट्रात म्हणजेच तळ कोकणात मान्सूनचा पाऊस दाखल झाला आहे.
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच राज्यभरात पूर्व मान्सून वादळी वाऱ्यांसहित पाऊस म्हणजेच अवकाळी पाऊस पडत होता. हा पाऊस राज्यातील विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पडत होता. यंदा मान्सून हा ७ जून रोजीच महाराष्ट्रात दाखल होण्याची चिन्हे होती पण यंदा मान्सूननेही लवकरच हजेरी लावली आहे.
पेरण्याची घाई नको
राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी आणि मान्सूनचा पाऊस सुरू असला तरी अनेक ठिकाणी आवश्यक ओल पोहोचली नाही. तर बऱ्याच शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीची लगबग सुरू केलेली आहे. पण पुरेशी ओल असल्याशिवाय पेरण्या न करण्याचे आवाहन कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागाने केले आहे.
बियाण्यांच्या भेसळीवर लक्ष
खरिपाच्या तोंडावर बाजारामध्ये भेसळयुक्त आणि बोगस बियाण्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खात्रीशीर बियाणे महाबीज किंवा राष्ट्रीय बीज निगम यांच्याकडून खरेदी करावेत. यासोबतच शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्यांना जास्त प्राधान्य द्यावे. पेरणी किंवा लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी बियाणांवर जैविक आणि रासायनिक बीजप्रक्रिया करावी.