रघुनाथदादा पाटील
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराला अलमट्टी धरण नव्हे तर पंचगंगा, कृष्णा नदीवर उभारलेले पूलच जबाबदार आहेत. पुलांच्या कमानींची संख्या कमी करून भराव टाकल्याने महापुराचा धोका वाढल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिली.
पाटील यांच्या नेतृत्वाखालील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कसबा बावडा येथील पुलापासून शिरोली पूल, गांधीनगर व इचलकरंजी, रुई बंधारे, कुरुंदवाड, नृसिंहवाडी, अंकली पूल, कुडची, उगार मार्गे हिपरग्गी, अलमट्टीपर्यंत त्यांनी पाहणी केली.
पंचगंगा व कृष्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्याचा थेट परिणाम पाण्याच्या प्रवाहावर दिसत आहे. पूल व बंधारे बांधताना पावसाळ्यात पाण्याचा विसर्ग वेगाने कसे होईल? हे पाहिलेच नाही.
पुलाच्या कमानी कमी करून त्या ठिकाणी मातीच्या भराव्याच्या भिंती उभारल्या आहेत. या भिंतींना पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा प्रवाह थांबतो असे पाटील यांनी सांगितले. त्यांच्या सोबत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक शिंदे, लक्ष्मण पाटील (वाळवा) आदी उपस्थित होते.
नवीन पूल बांधा
कोल्हापूर व सांगलीतील महापूर नियंत्रणासाठी ३,२०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून पुराच्या पाण्याला अडथळा ठरत असलेले पूल व बंधारे काढून तिथे नवीन पूल उभारावेत, अशी मागणी रघुनाथदादा पाटील यांनी केली.
स्वतःचे पाप झाकण्यासाठी
स्वतःचे पाप झाकण्यासाठी राज्य शासनही अलमट्टीकडे बोट करत आहे. समुद्रसपाटीपासून धरणाची उंची ५१९ मीटर आहे तर सांगली हरीपूर येथे ५४९ मीटर आहे. अलमट्टीपेक्षा ३० मीटरने उंची अधिक असताना येथे पूर येतोच कसा, असा सवालही पाटील यांनी केला.