Join us

राज्यात पुढील आठ दिवस ढगाळ वातावरण, बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 10:08 IST

राज्यात पुढील आठ दिवस पावसाचे वातावरण कसं असेल? कुठे पाऊस तर कुठे ढगाळ हवामान

आजपासून पुढील काही दिवस महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आजपासून 27 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात ढगाळ हवामानासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आलं आहे. 

मुंबईसह कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतच्या सर्व सात आणि खान्देश व नाशिकपासून ते सोलापूरपर्यंतच्या मध्य महाराष्ट्रातील सर्व 10 तसेच धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अशा महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांत आज गुरुवार 23 नोव्हेंबर आणि उद्या शुक्रवारी 24 नोव्हेंबर या दोन दिवस ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.        

त्यानंतर 25 नोव्हेंबर पासून ते 27 नोव्हेंबरपर्यंत या तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मात्र मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 26 नोव्हेंबर रोजी पावसाचे वातावरण अधिक गडद होवून खान्देश, नाशिक, नगर, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला जिल्ह्याच्या क्षेत्रात मात्र मुसळधार पावसाची शक्यता माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. मुंबईसह कोकणात पावसाळी वातावरणाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता आहे. 

अवकाळी पावसाचे नेमके कारण काय?

दरम्यान, तामिळनाडूतील कन्याकुमारी ते आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्याच्या किनारपट्टी समोर बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून तीन कि.मी. उंचीपर्यंत जाडीच्या हवेच्या कमी दाब क्षेत्राचा पसरलेल्या 'आस'मुळे 15 डिग्री अक्षवृत्तादरम्यान पूर्वेकडून येणाऱ्या आणि तामिळनाडू आणि केरळ राज्यावरून पश्चिमकडे वाहणाऱ्या हिवाळी मोसमी वाऱ्यामुळे व चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे तामिळनाडू व केरळ राज्यात सध्या भरपूर पाऊस पडत आहे. ही प्रणाली भू -भाग ओलांडून पुन्हा अरबी समुद्रात उतरून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी समांतर उत्तरेकडे आगेकूच करणार असल्याने गुजरात राज्यात याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात 26 नोव्हेंबर दरम्यान डांगी परिसरातून उतरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.                        बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता...

शनिवार  25 नोव्हेंबर रोजी वायव्य उत्तर भारतात आदळणाऱ्या पश्चिमी झंजावाताचा परिणाम थेट मध्यप्रदेश, गुजरातमधून उत्तर महाराष्ट्रापर्यंत होणार असल्यामुळे या दोन्हीही प्रणाल्यांचा एकत्रित परिणाम महाराष्ट्रावर 23 ते 27 नोव्हेंबरच्या पाच दिवसाच्या पावसाळी वातावरणावर होणार आहे. त्यानंतर नोव्हेंबरच्या शेवटच्या एक - दोन दिवसात चक्रीय वाऱ्याच्या स्थिती व कमी दाब क्षेत्रातून बंगालच्या उपसागरात पुन्हा एखाद्या चक्रीवादळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चक्रीवादळ विकसित होवून बांगलादेशकडे त्याची वाटचाल असु शकते, असे सांगण्यात आले आहे. परंतु महाराष्ट्रावर वादळाचा कोणताही परिणाम असणार नाही, अस देखील माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानशेतकरीपाऊसपीककाढणी