हर्षल शिरोडकर
रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील जगबुडी नदीची पाणी पातळी मंगळवारी दुपारी पुन्हा इशारा पातळीवर पोहोचली होती. सातारा, महाबळेश्वर या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली की, त्याचे पाणी जगबुडी नदीला येऊन मिळते.
त्यामुळे खेडमध्ये पावसाचा जोर नसूनही पाणी पातळीत वाढ झाली आहे. यावर्षी पावसाला सुरुवात झाल्यापासून नऊ दिवसा पाचव्यांदा जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर गेली आहे.
खेड तालुक्याच्या पूर्वेला सातारा जिल्ह्याची सीमा असून, महाबळेश्वर तालुका सीमावर्ती भाग आहे. या भागात अतिवृष्टी झाल्यास जगबुडी नदीची पाणी पातळी वाढते.
तसेच, सह्याद्री पर्वत रांगेत असणाऱ्या छोट्या नद्या, नाले या भागात मुसळधार पावसाने तुडुंब भरून वाहू लागले की, जगबुडी नदीचे पाणी काही तासांतच ५ मीटरपर्यंत पोहोचते.
तालुक्यातील आंबवली, खोपी कशेडी घाट, कांदाटी खोरे, रघुवीर घाट, वडगाव हातलोट घाट या परिसरात पडणारा पाऊसही जगबुडीची पातळी वाढवण्यासाठी मदत करतो.
मंगळवारी सकाळी तुरळक पावसाच्या सरी वगळता पावसाने विश्रांती घेतली होती. नारंगी नदी व चोरद नदी परिसरातही पावसाचे प्रमाण नगण्य होते. मात्र, तरीही जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत होती.
सातारा जिल्ह्यातील सीमावर्ती भागात व तालुक्यातील सह्याद्री पट्टयात मंगळवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहू लागली आहे. नदीची पाणी पातळी सकाळी ५.५० पर्यंत होती तर सायंकाळी ५ वाजता ही पाणी पातळी ५.४० मीटरपर्यंत आली होती.
प्रशासन 'अलर्ट'
जगबुडी नदीने इशारा पातळी गाठली की, नगर परिषद प्रशासन संभाव्य पुराचा धोका ओळखून 'अलर्ट' होते. जगबुडीने ६ मीटरच्यावर पाणी पातळी ओलांडली की, शहरात नगर परिषद प्रशासन भोंगा वाजवून नागरिकांना सूचना देते.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना
जगबुडी नदीची धोका पातळी ७ मीटर असून, खोपी-शिरगाव परिसरातील डुबी नदी, चोरद नदी व नारंगी नदी यांची पाणी पातळी वाढली, तर काही तासांतच जगबुडी नदी धोका पातळी गाठते. त्यामुळे नदी काठालगत असलेल्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जातात.
पाचवेळा इशारा पातळीवर
| तारीख | पातळी (मीटरमध्ये) |
| १६ जून | ६.३० |
| १९ जून | ६.९० |
| २० जून | ५.८० |
| २१ जून | ५.०० |
| २४ जून | ५.५० |
हेही वाचा : आता घर बसल्या एका क्लिकवर मिळवा गाव कारभाराची संपूर्ण माहिती; 'मेरी पंचायत' ॲप