नवी दिल्ली : देशात यंदा हिवाळा नेहमीपेक्षा कडाक्याचा असेल, असा इशारा प्रमुख हवामानतज्ज्ञांनी दिला आहे. वर्षअखेरीस ला नीना परिस्थिती उद्भवण्याची चिन्हे दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेच्या नॅशनल वेदर सर्व्हिसच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने ११ सप्टेंबर रोजी सांगितले की, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत ला नीना तयार होण्याची शक्यता ७१ टक्के आहे.
मात्र, डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान ती शक्यता ५४ टक्क्यांवर घसरण्याची शक्यता आहे. तरीही ला नीना वॉच सुरू असल्याचे केंद्राने म्हटले आहे. ला नीना ही एल निनो-सदर्न ऑस्सिलेशन (ईएनएसओ) चक्रातील थंड फेज मानली जाते.
या काळात विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरातील तापमान बदलते व त्याचा जागतिक हवामानावर परिणाम होतो. भारतात ला नीना काळात हिवाळ्यातील तापमान बहुधा सरासरीपेक्षा खाली राहते.
हवामान खात्याचा अंदाज◼️ भारतीय हवामान खात्याच्या ताज्या बुलेटिननुसार, सध्या पॅसिफिकमध्ये स्थिती तटस्थ आहे. मात्र, पावसाळ्यानंतर ला नीना निर्माण होण्याची शक्यता वाढते.◼️ आमच्या मॉडेल्सनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ला नीना विकसित होण्याची ५० टक्क्यांहून अधिक शक्यता आहे.◼️ साधारणपणे भारतात ला नीना काळाश थंड हिवाळ्याचा संबंध दिसतो, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.◼️ त्यांनी पुढे स्पष्ट केले की, हवामान बदलामुळे या थंडीची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊ शकते.◼️ पॅसिफिक महासागरातील थंडीमुळे उत्तरेकडील राज्ये व हिमालयीन भागात अधिक कडाक्याचा हिवाळा आणि मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होते.
संशोधन काय म्हणते?◼️ २०२४ मध्ये आयआयएसईआर (मोहाली) आणि ब्राझीलच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस रिसर्च यांनी केलेल्या अभ्यासात असे आढळले की, ला नीना परिस्थितीमुळे उत्तर भारतात तीव्र थंडीच्या लाटांना मोठ्या प्रमाणात चालना मिळते.◼️ या संशोधनात स्पष्ट झाले की, 'ला नीना'च्या काळात इतर काळांच्या तुलनेत थंडीच्या लाटा दीर्घकालीन आणि वारंवार असतात.
अधिक वाचा: सातबाऱ्यावरील इतर हक्कांतील नावे कायदेशीररीत्या कमी करायचीत? कशी कराल? वाचा सविस्तर