पुणे : राज्यामधील थंडीची लाट आता ओसरू लागल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली आहे; पण राज्यातील गारठा मात्र कायम आहे.
पुढील दोन दिवसांत राज्याच्या किमान तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुण्यातील थंडीही गायब झाली. हवेत गारवा मात्र जाणवत आहे. राज्यात शहरांतील किमान तापमान १० अंशांच्या वर नोंदवले गेले.
पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय असून, उत्तर आणि ईशान्येकडे सरकत आहे. शनिवारी (दि. २१) या प्रणालीची तीव्रता वाढू शकते. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका जरा कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, राज्यामधील थंडी कमी होऊ लागली आहे; पण धुळे, निफाड, जळगाव आणि अहिल्यानगर येथील गारठा अद्याप कमी झालेला नाही. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या वर गेला आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाले आहे. त्यामुळेच राज्यातील थंडी ओसरत आहे.
शनिवारपासून पुढील चार दिवस म्हणजे मंगळवार दि. २४ डिसेंबरपर्यंत मुंबईसह कोकण वगळता उर्वरित राज्यात पहाटे पाचचे किमान तापमान भागपरत्वे सरासरीपेक्षा १ ते ४ डिग्री से. ग्रेडने अधिक असल्यामुळे तेथे माफक थंडी जाणवत आहे.
मुंबईसह कोकणात मात्र हेच तापमान सरासरीपेक्षा १ ते २ डिग्रीने खालावल्यामुळे मुंबईसह कोकणात, उर्वरित महाराष्ट्राच्या मानाने तेथे कमी थंडी असल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
थंडीत होणार वाढ
पश्चिमी प्रकोपाच्या प्रेरित परिणामातून, नाताळ सणात म्हणजे २५ ते २९ डिसेंबर (बुधवार ते रविवार) पाच दिवसांदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात, भाग बदलत, ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यताही जाणवते. त्यातही गुरुवार दि. २६ ते शनिवार दि. २८ डिसेंबरपर्यंतच्या तीन दिवसांत पावसाचीही शक्यता अधिक जाणवते. वर्षाअखेरीस म्हणजे सोमवार दि. ३० डिसेंबरपासून हळूहळू थंडीत वाढ होऊन नववर्षाच्या उगवतीला पुन्हा थंडीची अपेक्षा आहे, असे खुळे यांनी सांगितले.
राज्यातील किमान तापमान
जळगाव - १२
अकोला - १४
नागपूर - १५.८
वर्धा - १६.५
अहिल्यानगर - १३.७
बीड - १४.१
मुंबई - २०
पुणे - १६.४
महाबळेश्वर - १३.८