Cold Weather : ३० नोव्हेंबर पासुन ते १९ डिसेंबर (वेळ आमावस्या) पर्यंतच्या २० दिवसात महाराष्ट्रात जाणवलेली थंडी अजुन तशीच पुढे ९ दिवस म्हणजे रविवार दि. २८ डिसेंबर पर्यंत जाणवू शकते.
उत्तरेतील ही थंडी सध्या महाराष्ट्र ओलांडून तेलंगणा कर्नाटकपर्यंत पोहोचली आहे. नाताळ सणादरम्यानच्या या काळात महाराष्ट्रात थंडीच्या लाटांची शक्यताही नाकारता येत नाही.
विदर्भात रात्री बरोबर दिवसाही थंडीचा अनुभव
आजपासुन रविवार दि. २८ डिसेंबर पर्यन्त, खान्देशातील जळगांव नंदुरबार सह विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात एखाद- दुसऱ्या दिवशीही थंड दिवस राहून दिवसाही थंडाव्यातून गारवा जाणवेल व हूड-हुडी भरेल..
त्यानंतर आठवडाभर काहीशी थंडी कमी होणार!
सोमवार दि. २९ नोव्हेंबर २०२५ ते मंगळवार दि.६ जानेवारी२०२६ (अंगारकी चतुर्थी)पर्यन्तच्या ९ दिवसात महाराष्ट्रात पहाटे ५ दरम्यानच्या किमान तापमानात वाढ होवून महाराष्ट्रात काहीशी थंडी कमी होण्याची शक्यता जाणवते. छत्तीसगडसह मध्य भारतात उद्भवलेल्या( घड्याळ काटा दिशेने) कमकुवत प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे, उत्तर भारतातून येणाऱ्या थंड कोरड्या वाऱ्यांना होणाऱ्या काहीशा अटकावामुळे थंडीचा हा बदल जाणवेल.
महाराष्ट्रातील खालील तीन जिल्ह्यात मात्र या ९ दिवसातही थंडी टिकूनच राहणार!
महाराष्ट्रातील नाशिक, छत्रपती, संभाजीनगर व अहिल्यानगर अशा ३ जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, चांदवड, येवला, नांदगाव, कन्नड, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, नेवासा, शेवगांव, पाथर्डी, राहुरी, श्रीरामपूर, राहता, कोपरगांव व संगमनेर अशा १७ तालुक्यात मात्र सोमवार दि. २९ नोव्हेंबर २०२५ ते मंगळवार दि. ६ जानेवारी २०२६ (अंगारकी चतुर्थी) पर्यंतच्या ९ दिवसातही थंडी ही जाणवेलच. तेथील कमाल तापमान २८ ते ३० डिग्री तर किमान तापमान ८ ते १२ दरम्यान जाणवेल. मुंबईसह कोकणात मात्र कमाल २८ ते ३० तर किमान १६ ते १८ डिग्री जाणवेल.
- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.
