देशाच्या उत्तर भागातून थंड वारे वाहत असल्याने सातारा जिल्ह्यातीलही किमान तापमानात वेगाने उतार येत चालला आहे. शनिवारी सातारा आणि महाबळेश्वर शहरांचा पारा १२ अंश नोंदवला. हे या हंगामातील नीच्चांकी तापमान ठरले. तसेच पारा घसरल्याने जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडू लागली आहे. यामध्ये आणखीही पारा घसरण्याचा अंदाज आहे.
सातारा जिल्ह्यात दरवर्षीच नोव्हेंबर महिना सुरू होत असतानाच थंडी पडायला सुरूवात होते. पण, यावर्षी थंडीला उशिरा सुरुवात झाली. कारण, ऑक्टोबर महिना संपेपर्यंत जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरूच होता. त्यानंतर २ नोव्हेंबरपर्यंतही जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला.
मात्र, यानंतर अवकाळी पावसाचे ढग विरले. तसेच वातावरणातही बदल झाला. सध्या जिल्ह्यातच हिवाळी ऋतू सुरू झाल्यासारखे वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे मागील आठवड्यापासून किमान तसेच कमाल तापमानातही उतार येत चालला आहे. परिणामी, जिल्हावासीयांना थंडी झोंबू लागलीय.
नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यातील पारा हळूहळू कमी होत गेला. त्यातच सातारा शहरात ८ नोव्हेंबरला किमान तापमान १७.१ अंश नोंदवले होते. त्यानंतर पारा खालावत गेला. त्यामुळे सोमवारी १३.६ अंशाची नोंद झाली. परत साताऱ्याचे किमान तापमान वाढले.
या कारणाने बुधवारी पारा १५ अंश नोंद झाला पण, त्यानंतर वातावरणात वेगाने बदल झाला. उत्तर बाजूने थंड वारे वाहत असल्याने राज्यातही थंडी वाढली. या कारणाने सातारा जिल्ह्यातही थंड वाऱ्याच्या झुळूकेबरोबरच पाराही खालावला. यामुळे शनिवारी सातार शहरात १२ अंश किमान तापमानाची नोंद झाली. हे या हंगामातील नीच्चांकी तापमान ठरले आहे. तसेच महाबळेश्वरचाही पार घसरला आहे.
