Join us
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी पिकांसाठी कडवा कालव्याला आवर्तन सोडले; भोजापूर धरणातून देखील आवर्तन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:37 IST

रब्बी हंगामासाठी कडवा कालव्याला मंगळवारपासून (दि. २०) आवर्तन सोडण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता सोडलेले पाणी सायंकाळी पाचपर्यंत पांढुर्ली शिवारात पोहोचले. कालव्याला आवर्तन सुरू होताच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सिन्नर : रब्बी हंगामासाठी कडवा कालव्याला मंगळवारपासून (दि. २०) आवर्तन सोडण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता सोडलेले पाणी सायंकाळी पाचपर्यंत पांढुर्ली शिवारात पोहोचले. कालव्याला आवर्तन सुरू होताच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

जलसंपदा विभागाने या आवर्तनातून सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचे पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गहू, मका, हरभरा आदी रब्बी पिकांसह डाळिंब व द्राक्ष बागांसाठी शेतकऱ्यांनी पाणी मागणीची नोंद केली असून, पुढील काही दिवसांत या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आवर्तन सुरू झाल्याने पाणी मागणी अर्ज भरण्यासही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, कालव्याला पाणी सोडण्यात आले असले तरी शेवटच्या टोकापर्यंत पाणी सुरळीत पोहोचावे, यासाठी डोंगळे शोधण्याची मोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांत कर्मचाऱ्यांनी तब्बल ७५ डोंगळे शोधून उद्ध्वस्त केले आहेत. पाणीचोरीचे प्रकार घडू नयेत व आवर्तनात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

गरज भासल्यास पोलिसांची मदत घेणार : चव्हाणके

उपविभागीय अभियंता सचिन चव्हाणके यांनी सांगितले की, पाणीचोरी रोखण्यासाठी गरज भासल्यास पोलिसांची मदत घेतली जाईल. तसेच गस्तीवरील पथकांना कालव्यावर सतत वॉच ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रब्बी हंगामातील सिंचनासाठी हे आवर्तन शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

रब्बी हंगामासाठी भोजापूर धरणातून सिंचनाचे आवर्तन

नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या भोजापूर धरणातून रब्बी हंगामातील पिकांसाठी आवर्तन सोडण्यात आले असून, आठ दिवसांत लाभक्षेत्रातील सुमारे २०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. रब्बीसाठी सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाण्याची मागणी नोंदवण्यात आली आहे.

दरम्यान, धरणातून एकूण २०० दशलक्ष घनफूट पाणी देण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले. जलसंपदा विभागाकडून १ जानेवारीपासून पाणी मागणी अर्ज भरून घेतले जात होते. सुरुवातीच्या काळाला केवळ ४०० शेतकऱ्यांनी ५०० हेक्टर क्षेत्रासाठी मागणी नोंदवली होती. त्यानंतर नांदूरशिंगोटे व दोडी शाखेवरील पाणी

वापर संस्था यांच्या मागणीनुसार कामाला वेग आला. अजूनही शेतकऱ्यांकडून पाणी मागणी अर्ज केले जात आहेत. सिन्नर तालुक्यातील दोडी खुर्द, दोडी बुद्रुक, खंबाळे, भोकणी, दातली, नांदूरशिंगोटे, कणकोरी, मानोरी, मन्हळ, पांगरी, निहाळे, दुशिंगपूर, शिवाजीनगर, संगमनेर तालुक्यातील निमोण, कन्हे, पळसखेडे, सोनेवाडी, पिंपळे या गावांना रब्बी आवर्तनाचा लाभदिला जातो.

विशेषतः रब्बीतील गहू, हरभरा व मका आणि फळबागांसाठी लाभ देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच दोडी, कणकोरी, नांदूरशिंगोटे व संगमनेर तालुक्यातील पिंपळे या गावात सध्या पाणी वितरणाचे काम सुरू आहे. लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा : तूर शेती ठरतेय शेतकऱ्यांना फायद्याची; पारंपरिक पिकांना फाटा देत तयार होतंय तूर हब

English
हिंदी सारांश
Web Title : Water Released for Rabi Crops from Kadwa Canal and Bhojapur Dam

Web Summary : Kadwa Canal water released for Rabi crops, benefiting 2000 hectares. Bhojapur Dam irrigation starts, covering 200 hectares. Water theft prevention efforts underway.
टॅग्स :रब्बी हंगामपाणीशेतीनाशिकअहिल्यानगरधरणशेती क्षेत्र