Join us
Daily Top 2Weekly Top 5

युवा शेतकरी सुरेश यांचा विषमुक्त स्ट्रॉबेरी शेती पॅटर्न करतोय उत्पादन खर्चात बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 09:21 IST

भोर तालुक्यातील दुर्गम घाटमाथ्यावरील हिरडस मावळ खोऱ्यातील धामणदेववाडी हिडोंशी येथील सुरेश कोंडिबा गोरे या युवा प्रयोगशील शेतकऱ्याने डोंगर उतारावरील माळरानावर स्ट्रॉबेरीची शेती फुलविली आहे.

पारंपरिक भात शेतीला फाटा देत नगदी पीक म्हणून ओळखले जाणारी स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी केली आहे. भाताची शेती म्हणून ख्याती असलेल्या या परिसरात नाचणीच्या शेतात रासायनिक खतांचा, औषधांचा वापर न करता सेंद्रिय व जिवाणू खताचा जास्तीत जास्त वापर करून नैसर्गिक पद्धतीने स्ट्रॉबेरी हे नगदी पीक युवा प्रयोगशील शेतकरी सुरेश कोंडिबा गोरे यांनी घेतली आहे.

भोर तालुक्यातील दुर्गम घाटमाथ्यावरील हिरडस मावळ खोऱ्यातील धामणदेववाडी हिडोंशी येथील सुरेश कोंडिबा गोरे या युवा प्रयोगशील शेतकऱ्याने डोंगर उतारावरील माळरानावर स्ट्रॉबेरीची शेती फुलविली आहे. १० गुंठे एवढ्या कमी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत राजेंद्र ढेबे यांचे मार्गदर्शन घेत बेड फार्मिंग प्रयोग केला.

महाबळेश्वर येथील राजेंद्र ढेबे यांच्या नर्सरीमधून आर वन व नाबिला जातीची ७ हजार रोपे प्रतिरोप १५ रुपये प्रमाणे विकत आणले. स्ट्रॉबेरीच्या रोपांची लावणी करण्याआधी जमिनीची खोल नांगरणी व कुळवणी करून घेतली. गादी वाफ्यांवर दोन रोपांमधील अंतर ४५ सेंमी, तर दोन ओळींमधील अंतर ६० सेंमी ठेवून रोपांची लागण केली. शेणखत, जीवामृत, लेंडी खतांचा वापर केला.

विहीर आणि बोअरवेलचा वापर करून ठिबक सिंचनाद्वारे रोपांचे पाण्याचे व्यवस्थापन करण्यात आले. आजतागायत अडीच लाख रुपये खर्च करून तीन टन स्ट्रॉबेरीचे उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. २०० रुपये किलोने सहा लाखांचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा: भात शेतीच्या पट्ट्यात पॉलीहाऊसमधील फुलशेती वाढवतेय स्वातीची ख्याती

आई येसाबाई गोरे, वडील कोंडिबा गोरे व भाऊ मारुती गोरे यांच्या सहकार्याने स्टॉबेरीची शेती यशस्वी केल्याचे सुरेश सांगतात. आई शेतात काम करून भोर महाड मार्गावरील हिडोंशी वारवंडदरम्यान असणाऱ्या पुलाजवळ स्टॉल लावून स्ट्रॉबेरी विक्री करते, तर सुरेश हा पुणे येथे जाऊन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचून स्ट्रॉबेरी विक्री करत आहे. त्यामुळे चांगला भावही मिळत आहे.

कमी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा करून मल्चिंग पेपरचा वापर केल्याने पाणी कमी प्रमाणात लागले तसेच तण नियंत्रणामुळे मजूर कमी प्रमाणात लागले, कमी मनुष्यबळाच्या साहाय्याने शेती करणं शक्य झाले आहे. फळाचा वैशिष्ट्यपूर्ण सुगंध, चमकदार लाल रंग, लज्जतदार पोत आणि गोडीमुळे मागणी जास्त आहे. - सुरेश गोरे, धामणदेववाडी, हिडोंशी प्रयोगशील शेतकरी

टॅग्स :शेतकरीशेतीफळेपीकमावळभोरबाजार