Join us

काय सांगताय; ढबू मिरची पिकात सहा महिन्यांत तब्बल ५० लाख रुपयांची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 3:48 PM

शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करणारे सिद्धेवाडी (ता. मिरज) येथील प्रयोगशील शेतकरी रामचंद्र वाघमोडे यांनी ढबू मिरची उत्पादनाचा विक्रम केला आहे. मिरचीचे सरासरी १० तोडे होतात, पण वाघमोडे यांनी योग्य नियोजनाने तेराहून अधिक तोडे घेतले आहेत.

अण्णा खोतमालगाव : शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करणारे सिद्धेवाडी (ता. मिरज) येथील प्रयोगशील शेतकरी रामचंद्र वाघमोडे यांनी ढबू मिरची उत्पादनाचा विक्रम केला आहे. मिरचीचे सरासरी १० तोडे होतात, पण वाघमोडे यांनी योग्य नियोजनाने तेराहून अधिक तोडे घेतले आहेत. त्याद्वारे १५० टन उत्पादन घेतले असून, सहा महिन्यांत तब्बल ५० लाख रुपयांची कमाई केली आहे.

सध्या मिरचीचा पंचविसावा तोडा घेण्याचे त्यांचे उद्दिष्ट्य आहे. वाघमोडे यांच्यासह मुले संतोष व सतीश यांनी भाजीपाला उत्पादनात नावलौकिक मिळवला आहे. गेल्या जूनमध्ये साडेचार एकर द्राक्षबागेत टोमॅटोचे आंतरपीक घेतले होते. त्यातून तीन महिन्यांत ५० लाख रुपयांचे उत्पादन घेतले होते.

द्राक्षांचाही दर्जा राखत चढ्या दराने विक्री केली आहे. सध्या त्यांचा भोसे येथे महामार्गालगत त्यांना फुलवलेला ढबू मिरचीचा फड शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे.

ढबू मिरचीमध्ये आजवर जास्तीत जास्त १० ते १२ तोडे घेतल्याची नोंद आहे. संतोष व सतीश यांचा यातही विक्रमाचा प्रयत्न सुरू आहे. अडीच एकरात प्रोफेसर वाणाची मिरची लावली आहे. लागवडीसाठी पाच लाखांचा खर्च झाला. योग्य नियोजनाने ५० दिवसांत उत्पादन सुरू झाले. आठवड्यातून दोनवेळा तोडणी केली जाते.

एका तोडणीत सुमारे १२ टन मिरची मिळते. १५० टनांतून ५० लाखांची कमाई केली आहे. या मिरचीचे एकूण २५ तोडे घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसे झाल्यास तो विक्रम ठरणार आहे, असा दावा शेतकऱ्याने केला आहे.

शेतीमध्ये प्रयोगशीलता महत्त्वाची आहे. संतोष व सतीश यांचा नवीन तंत्रज्ञान व योग्य नियोजनाद्वारे शेतीवर भर असतो. ढोबळी मिरचीच्या उत्पादनात विक्रम करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. आजवर दहा तोडीनंतर मिरचीचा प्लॉट सोडून दिला जातो. मात्र आम्ही योग्य नियोजनाने प्लॉट टिकवून ठेवला आहे. किमान २५ तोडे घेण्याचा प्रयत्न आहे. - रामचंद्र वाघमोडे, प्रयोगशील शेतकरी

 अधिक वाचा: संदेश आणि आदेशची किमया माळरानावर फुलवली ढोबळी मिरचीची दुनिया

टॅग्स :शेतकरीशेतीभाज्यासांगलीद्राक्षेटोमॅटोमिरजमिरची