माणिक डेरे
केवळ १०० दिवसांच्या कालावधीचे मानले जाणारे चवळी पीक तब्बल १५५ दिवस उत्पादनक्षम ठेवत वाशिम जिल्ह्याच्या बेलोरा (ता. मानोरा) येथील प्रयोगशील आणि अल्पभूधारक शेतकरी विशाल विष्णू ठाकरे यांनी चवळी व भाजीपाला पिकांमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
शेतकरी ठाकरे यांनी एक एकर क्षेत्रामध्ये आडवी व उभी पंजी मारून त्यामध्ये रोटावेटर मारले व त्यानंतर बैलाच्या साह्याने तीन फूट अंतरावर बेड पाडून १८ नोव्हेंबर २०२४ रोजी ग्रीन गोल्ड ३०९ या चवळी बियाण्याची एकरी तीन किलो तीन बाय एक या अंतराने टोकन यंत्राच्या मदतीने लागवड केली होती.
चवळी लागवड करते वेळेस एक एकर क्षेत्रामध्ये दोन ट्रॉली शेणखत, दोन बॅग दाणेदार व एकरी २५ किलो पोटॅश देत व पंधरा दिवसा नंतर खताची दुसरी मात्रा २४.२४.० व सूक्ष्म अन्नद्रव्य खत १० किलो ठाकरे यांनी चवळी पिकाला दिले होते. तसेच त्यानंतर ३० दिवसांनी खताची तिसरी मात्रा ८.२१.२१ व एकरी युरिया २० किलो दिले व लागवडीच्या १५ दिसानंतर ट्रायकोडर्मा व ह्यूमिक ऍसिड याची ड्रीचिंग देखील केली होती.
आपल्या अचूक मेहनतीच्या जोरावर शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करून चवळी या पिकाचे रेकॉर्डब्रेक उत्पन्न विशाल ठाकरे यांना मिळाले आहे. ज्यात ५४ क्विंटल ताज्या शेंगा आणि २ क्विंटल वाळलेल्या शेंगांचे उत्पादन मिळाल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
'असे' राखले नियोजन
चवळी पिकावर येणाऱ्या विविध कीड रोगांच्या नियंत्रणासाठी एम.४५ प्रोक्लेम, लिंबोळी अर्क या औषधीची दर सहा दिवसाला आलटून पलटून फवारणी करत ठाकरे यांनी चवळीचे चांगले उत्पादन घेतले.
दिग्रस, मानोरा भागात केली विक्री !
शेतकरी विशाल ठाकरे यांनी त्यांच्या शेतात मनरेगातून विहीर घेतली आहे. त्याला पक्क्या पाण्याचा स्त्रोत असून, सिंचनासाठी सौर पंप बसवण्यात आला आहे. उत्पादित चवळीच्या शेंगांची ते दिग्रस व मानोरा बाजारात विक्री करत आहेत.
खत, किटकनाशक फवारणी आणि पाण्याचे योग्य नियोजन करून चवळीचे विक्रमी उत्पादन घेता येणे शक्य झाले. भाजीपाला पिकांमधूनही उत्पन्न मिळाले. - विशाल ठाकरे, शेतकरी.
पारंपरिक पिकांपासून नुकसान होत असल्याने युवा शेतकऱ्यांनी आता भाजीपाला लागवडीकडे वळायला हवे. विशाल ठाकरे यांची चिकाटी व नियोजन कौतुकास्पद आहे. - सतीश वाढवे, कृषी सहाय्यक.
संत्र्याच्या बागेत विविध आंतरपिके !
यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे संत्र्याला मृग बहार धरला नाही. त्यामुळे मात्र खचून न जाता शेतकरी ठाकरे यांनी संत्र्याच्या बागेत गाजर, पालक, मेथी, कांदा ही आंतरपीके घेतली. त्यात गाजराचे त्यांना विक्रमी उत्पादन झाले. १० फेब्रुवारी रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह व अन्य कृषी अधिकाऱ्यांनी शेताला भेट देऊन त्यांचे कौतुक केले.