विठ्ठल ऐनापुरेजत: रामपूर (ता. जत) येथील महाराष्ट्र शासनाचा पंजाबराव देशमुख कृषिभूषणप्राप्त प्रगतिशील शेतकरी शशिकांत शिवाजीराव काळगी हे ५० एकर शेतीतून आले, टोमॅटो व सिमला मिरची यातून वर्षाला आठ कोटी रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.
जत शहरालगतच असलेल्या रामपूर गावच्या हद्दीत शशिकांत काळगी यांची ८० एकरांहून जास्त बागायत शेतजमीन आहे. त्यात ते वर्षात टोमॅटो, आले, सिमला मिरची, हळद, द्राक्षे अशा पिकांचे उत्पन्न घेतात.
काळगी हे सिमला मिरचीचे ४० एकरामध्ये लागवड करतात. यासाठी लागणारी रोपे ते भोसे येथील रोपवाटिकेतून दोन रुपयास एक रोप या दराने खरेदी करतात.
रोपाची लागण झाल्यानंतर पाच महिन्यांत सिमला मिरचीचे पीक येते. त्यानंतर त्याची तोड सुरू होते व बाजारपेठेत मिरची विकली जाते. यातून शशिकांत काळगी यांना किलोमागे ६२ ते ६५ रुपये मिळतात.
सात महिन्यांत काळगी हे सिमला मिरचीचे पंधराशे टन उत्पादन घेतात. एकरी पन्नास टन उत्पन्न ते या पिकातून घेतात. मिरची लागवड शेतात सत्तर महिला कामगार काम करतात. यासह त्यांनी एक व्यवस्थापकही ठेवला आहे.
सिमला मिरचीचा चांगल्या प्रतीचा माल निवडून तो पॅकिंग बॉक्समध्ये भरला जातो. हा माल मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा आदी राज्यांमध्ये पाठविला जातो.
शशिकांत काळगी हे वीस एकरात सिमला मिरचीची लागवड करतात. त्याच्या शेजारचा वीस एकर कोणतीही पिके न घेता वर्षभर ऊन खाण्यासाठी रिकामा ठेवतात.
वर्षभरानंतर त्या रिकाम्या प्लाटमध्ये आले, टोमॅटो, सिमला मिरची अशी विविध पिके घेतात. त्यामुळे वर्षातील नऊ महिने या पिकांचे नियोजन सुरू असते व स्थानिक व्यापारी व बाहेरील राज्यातील व्यापारी यांची मागणी ते पूर्ण करतात. यातूनच त्यांना वर्षाला आठ कोटींचे उत्पन्न मिळत आहे.
शशिकांत काळगी यांना याकामी शेती शिक्षण घेतलेला मोठा मुलगा मुरगेश, इंजिनिअर असलेला छोटा मुलगा योगेश मदत करत आहेत. दुष्काळी जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शशिकांत काळगी हे प्रेरणास्रोत आहेत.
चांगला पर्याय निवडावातालुक्यातील शेतकरीही आपल्या शेतीमधूनही नियोजनाद्वारे शिमला मिर्ची, आले, टोमॅटो अशा पिकांची लागवड करून चांगले उत्पन्न घेऊ शकतात. त्यांनी चांगला अर्थिक उत्पन्न देणारा पर्याय निवडावा, असे आवाहनही शशिकांत काळगी यांनी शेतकरीवर्गाला केले आहे.
अधिक वाचा: कीर्तन गाजविणाऱ्या कृष्णा महाराजांनी पपई शेतीतून पाऊण एकरात केली अडीच लाखांची अर्थप्राप्ती