Join us

कांदा उत्पादकांच्या एकजुटीला यश; माणिकपुंज परिसरातील शेतकऱ्यांनी धरली प्रगत शेतीतून परराज्यातील बाजारांची वाट

By रविंद्र जाधव | Updated: February 25, 2025 09:12 IST

Onion Farming : आवर्षण प्रवण तालुका म्हणून प्रचलित असलेल्या नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज या धरणालगत परिसरातील काही गावे आता बागायती शेती पद्धतीमुळे समृद्ध होत आहे. 

आवर्षण प्रवण तालुका म्हणून प्रचलित असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज या धरणालगत परिसरातील काही गावे आता बागायती शेती पद्धतीमुळे समृद्ध होत आहे. 

पाच ते सात हजार लोकसंख्या असलेल्या माणिकपुंज (ता. नांदगाव) येथे सध्या खरिपात ९० हेक्टर, लेट खरीप (रब्बी) १२५ एकर, उन्हाळ हंगामात १३० हेक्टरवर कांदा पिकविला जातो.

हाकेच्या अंतरावर असलेल्या नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे तसेच मुबलक सिंचन व्यवस्था उपलब्ध झाल्याने या परिसरात अलीकडे झपाट्याने कांदा पिकाचा मोठा विस्तार बघावयास मिळतो आहे. 

दरम्यान कृषी विभाग, आत्मा यांच्या संयुक्त मार्गदर्शनाने व विविध कार्यशाळेतून समृद्ध होत माणिकपुंज गावांमधील अनेक शेतकरी आता जैविक पद्धतीने कांदा उत्पादन घेत आहे.

कृषी विभाग आत्माच्या शेतीशाळेत विविध विषयांची माहिती जाणून घेतांना शेतकरी.

गांडूळखत, ट्रायकोडर्मा, किड नियंत्रण सापळे आदींचा वापर करत शेतकरी अधिक काळ टिकवण क्षमता असलेला कांदा उत्पादनात देखील परिपूर्ण झाले आहे.  

२-३ महीने साठवून राहणारा कांदा आता ६ महीने टिकून राहतो आहे. ज्यामुळे माणिकपुंज येथील शेतकरी बाजारात टंचाई असतांना ओक्तोंबर नोव्हेंबर मध्ये कांदा विक्री करतात. परिणामी वाढीव दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित फायद्या होतो आहे. 

मात्र अनेकदा बाजारात कृत्रिमरित्या दर पाडले जातात. पर्यायाने यात शेतकरी भरडल्या जातो. यावर माणिकपुंज येथील दादाभाऊ नामदेव दाभाडे यांनी कृषी विभाग आत्मा नंदगाव यांच्या मदतीने २०१४ मध्ये जय लक्ष्मी माता स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापना केली. पुढे प्रक्रिया उद्योगाची माहिती घेऊन उद्योग उभारण्याची तयारी दर्शविली मात्र काही कारणास्तव यात यश आले नाही. 

स्मार्ट प्रकल्पाची साथ थेट परराज्यात कांदा विक्री मिळाली वाट 

२०२१ मध्ये स्मार्ट प्रकल्प आत्मा अंतर्गत जय लक्ष्मी माता कृषी शेतकरी उत्पादक कंपनी ची स्थापना केली. ज्या अंतर्गत दाभाडे आज परिसरातील ४५० शेतकऱ्यांकडील कांदा थेट शेतातून खरेदी करून बिहार, पश्चिम बंगाल, तेलंगणा आदी ठिकाणी सरासरी वार्षिक १२ हजार मेट्रिक टन कांदा विक्री करत आहे.

परिसरातील 'या' गावांचा समावेश 

दाभाडे यांच्या सह परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी.

दाभाडे यांच्या शेतकरी उत्पादन कंपनीत माणिकपुंज परिसरातील टाकळी, पोखरी, जळगाव, बाणगाव, तांदूळवाडी, साकोरा आदी गावांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

कृषी विभाग व आत्मा यांच्या विविध कार्यशाळेतून माहिती घेत जैविक पद्धतीने कांदा उत्पादन घेण्यास सुरुवात केली. ज्याचा फायदा असा झाला की, आता आमचा दीर्घ काळ सुस्थितीत राहतो आहे. - समाधान सुदाम वाघ, सरपंच तथा कांदा उत्पादक शेतकरी माणिकपुंज. 

गट तसेच शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत शेतकरी एकत्र आले. ज्याचा फायद्या आज परिसरातील सर्व सभसदांना होतो आहे. थेट शेतातून कांदा खरेदी होत असल्याने वाहतूक खर्च कमी होत असून परराज्यात विक्री केल्याने नांदगाव परीसरापेक्षा निश्चित अधिक योग्य दर देखील मिळतो आहे.  - दादाभाऊ दाभाडे अध्यक्ष जय लक्ष्मी माता कृषी शेतकरी उत्पादक कंपनी माणिकपुंज.

हेही वाचा : कांद्याच्या शेतीने विकासाला मिळाली उभारी; राज्यातील 'हे' गाव आज देतंय तालुक्याला टक्कर भारी

टॅग्स :शेतकरी यशोगाथाकांदाबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीनाशिकशेतीशेतकरीशेती क्षेत्र