Join us

गोटखिंडी येथील थोरात बंधूंनी घेतला आधुनिक शेतीचा ध्यास; केळीतून वर्षाला घेताहेत ६० लाखांचं उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 13:33 IST

Agriculture Success Story : अलीकडच्या काळात शेतकरी पारंपरिक शेतीला बगल देत आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल ऊस लागवडीकडे अधिक असल्याचे दिसत आहे.

प्रतापसिंह माने 

अलीकडच्या काळात शेतकरी पारंपरिक शेतीला बगल देत आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल ऊस लागवडीकडे अधिक असल्याचे दिसत आहे.

सांगली जिल्ह्याच्या गोटखिंडी (ता. वाळवा) येथील अशाच एका शेतकऱ्याने केळीच्या बागेतून आर्थिक प्रगती साधली आहे. दहा एकर केळीच्या बागेतून तब्बल ६० लाखांचं उत्पन्न घेतलं आहे.

उपसरपंच व राजारामबापू दूध संघाचे संचालक धैर्यशील थोरात व फत्तेसिंग सिंह थोरात हे वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील शेतकरी आहेत. त्यांनी केळीच्या शेतीतून मोठं उत्पन्न मिळवलं आहे. त्यांनी मोठी मेहनत करून केळीच्या पिकातून चांगला नफा मिळवला आहे. सुरुवातीला त्यांच्याकडे पारंपरिक उसाची शेती होती.

मात्र, त्यांनी ऊस शेती सोडून केळीची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांची ३० एकरावर जमीन असून, त्यातील १० एकर ऊस, १० एकर केळी व १० एकर कोरडवाहू पीकं घेतात. बावचीचे प्रगतशील शेतकरी संपतराव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली केळी घेणारे शेतात मेंढ्या बसवून खतवून घेतात.

शेणखत घालून मशागत करून पाच फुटी सरीने झिगझेंग पद्धतीने एकरी १,३०० रोपे लावून घेतली, असे धैर्यशील थोरात यांनी सांगितले. ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले. ठिबकद्वारेच रासायनिक खताची योग्य मात्रा दिल्यामुळे पिकाला त्याचा चांगला फायदा होतो.

४० टनापर्यंत उत्पन्न

गोटखिंडी येथील थोरात बंधूंच्या आधुनिक शेतीचा अन्य शेतकऱ्यांनीही आदर्श घ्यावा, अशीच त्यांनी शेती केली आहे. केळीच्या एका घडाचे ३० ते ४० किलो वजन भरतो. एकरी ४० टनपर्यंत विक्रमी उत्पन्न घेतले आहे.

केळी पीक घेतल्याने जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीस वापसा मिळतो. या पिकानंतर बदल करून ऊस पीक घेतल्यास उसाचे टनेज वाढते. ऊस आणि केळी असे बदल करून पीक घेतल्यास जमिनी चांगल्या राहतात. पिकाचे उत्पन्नही वाढण्यास मदत होते. शेतकऱ्यांनी पिकाचे योग्य नियोजन केल्यास उत्पादनात वाढ होते. सेंद्रिय खताबरोबरच रासायनिक मात्रा देत आम्ही केळीमध्ये विक्रमी उत्पादन घेत आहोत. - धैर्यशील थोरात, प्रगतशील शेतकरी व संचालक, राजाराम बापू दूध संघ.

हेही वाचा : ढेगे पिंपळगावच्या शेतात पिवळ्या टरबूजचा यशस्वी प्रयोग; ओमरावांनी घेतले ४० गुंठयात दोन लाख चाळीस हजारांचे उत्पन्न

टॅग्स :शेतकरी यशोगाथाशेतीबाजारकेळीसांगलीशेतकरीफलोत्पादनफळेशेती क्षेत्र