Join us

व्यापाऱ्याला लागली शेतीची गोडी; दुष्काळी जतमधून क्रिमसन सिडलेस द्राक्षाची युरोप, दुबईची वारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 2:08 PM

कायम दुष्काळी तालुका अशी जतची ओळख आहे. पण, याच जत तालुक्यात प्रयोगशील शेतकऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जत येथील प्रगतशील शेतकरी सिकंदर पटाईत यांनी सिडलेस क्रिमसन वाणाची द्राक्ष लागण करून विक्रमी उत्पादन घेतले आहे.

सांगली जिल्ह्यातील कायम दुष्काळी तालुका अशी जतची ओळख आहे. पण, याच जत तालुक्यात प्रयोगशील शेतकऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जत येथील प्रगतशील शेतकरी सिकंदर पटाईत यांनी सिडलेस क्रिमसन वाणाची द्राक्ष लागण करून विक्रमी उत्पादन घेतले आहे.

एकरी १० ते १२ लाख रुपयांचे त्यांना उत्पन्न मिळाले आहे. जतच्या क्रिमसन सिडलेस द्राक्षाने दुबईच्या खवय्यांना भुरळ घातली आहे. प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबात जन्मलेले सिकंदर पटाईत यांना व्यापार ऐवजी आधुनिक शेतीचे आकर्षण वाटू लागले.

यातूनच त्यांनी जतपासून दोन किलोमीटर अंतरावर पाच एकर शेती घेऊन बागायत केली आहे. यापैकी पाच एकरमध्ये क्रिमसन सिडलेस द्राक्षाची २०१९ मध्ये लागण केली आहे. छाटणीसह सर्व खर्च दोन ते अडीच लाख रुपये आला आहे.

अन्य द्राक्षापेक्षा कीटकनाशक फवारणीचा खर्च कमी असल्याचे सिकंदर पटाईत यांनी सांगितले. ते म्हणाले, यावर्षी पहिलीच छाटणी घेऊन हंगाम घेतला आहे. पहिल्याच वर्षी सहा ते सात टन द्राक्ष निघाली आहेत.

बहुतांशी द्राक्षेदुबईला पाठविली आहेत. प्रतिकिलो १३० रुपयेपर्यंत दर मिळाला आहे. क्रिमसन सिडलेस हा वाण कमी खर्चात चांगल्या पद्धतीने येत आहे. क्रिमसन हे लाल रंगाची द्राक्ष ग्राहकांना आकर्षित करून घेत आहेत.

तसेच सर्वाधिक गोड असल्यामुळे ग्राहकांच्या पसंतीस क्रिमसन सिडलेस उतरले आहे. युरोप, रशिया, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध आहे. तरीही दुबईला चांगला दर मिळाल्यामुळे तिकडे पाठविले आहेत.

औषधी गुणधर्म• क्रिमसन द्राक्षामध्ये गुणधर्म लाभलेले आहेत. सर्वच द्राक्षे खाणे हे आरोग्यासाठी चांगले आहेत. शेतकऱ्यांनी किटकनाशकांचा वापर कमी करण्याची गरज आहे.• यामध्ये सी व्हिटॅमिन भरपूर असल्याने चेहरा व त्वचा स्वच्छ ठेवणे, त्वचेवरील डाग व मुरूम नाहीसे करणे, पचनक्रिया सुधारणे, रोसवेरा ट्रोलमुळे वृद्धत्व कमी करणे, बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थामुळे अँटिव्हायरल गुणधर्म यामध्ये आहेत.• बहुगुणी उत्तम प्रतीचे द्राक्ष खाल्ल्याने आरोग्य सुधारण्यास भरपूर मदत होते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ही आहेत वैशिष्ट्येक्रिमसन सीडलेस द्राक्षे हे किंचित लांबलचक हलके-लाल सीडलेस द्राक्ष असून त्यात भरपूर गोडवा आणि आकर्षक देखावा आहे. त्वचेचा रंग गुलाबी ते गडद गुलाबी-लाल असतो, बहुतेकदा फिकट हिरव्या स्टेमच्या टोकासह. लगदा हिरवट-पांढरा असतो आणि त्यात मध्यम प्रमाणात कुरकुरीतपणा असतो.

क्रिमसन सिडलेस द्राक्षाला उत्पादन खर्च कमी आहे. तसेच द्राक्षामध्ये नैसर्गिक गोडी चांगली आहे. चवदार द्राक्षांमुळे युरोप, दुबईला मोठ्या प्रमाणात द्राक्षांना मागणी आहे. सध्या प्रतिकिलो १३० रुपये दर मिळाला आहे. पहिलेच वर्ष असतानाही १० ते १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. - सिकंदर पटाईत, प्रगतशील शेतकरी, जत

अधिक वाचा: द्राक्षबाग व्यवस्थापनासाठी लाखेवाडीच्या सरपंचबाईंनी तयार केली महिलांची फौज

टॅग्स :द्राक्षेशेतकरीफळेशेतीजाटदुष्काळपीकदुबई