Join us

आंबा लागवडीचा इस्रायली पॅटर्न देईल एकरी ८ लाखाचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 12:45 PM

केशर, हापूस आंबा म्हटले की, कोकणाची आठवण येते. सुधारित तंत्राचा वापर, योग्य व्यवस्थापन, कष्ट व जिद्द या जोरावर जत तालुक्यातील रामपूर येथील अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या हर्षवर्धन संजय कांबळे यांनी नोकरीच्या मागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला.

गजानन पाटीलकेशर, हापूस आंबा म्हटले की, कोकणाची आठवण येते. सुधारित तंत्राचा वापर, योग्य व्यवस्थापन, कष्ट व जिद्द या जोरावर जत तालुक्यातील रामपूर येथील अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या हर्षवर्धन संजय कांबळे यांनी नोकरीच्या मागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. दुष्काळावर मात करून उजाड फोंड्या माळरानावर दोन एकर क्षेत्रावर त्यांनी केशर आंब्याची बाग फुलवली आहे.

हर्षवर्धन हे अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला शिकत आहेत. त्यांना मूळातच शेतीची आवड आहे. सेंद्रिय खतांचा वापर, पाण्याचा काटकसरीने वापर करून मध्यम प्रतीच्या जमिनीतसुद्धा नंदनवन उभे करता येते. हा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. दुष्काळी भागातील शेती विकासाचे आदर्श मॉडेल खडकाळ माळरानावर उभे राहिले आहे. हर्षवर्धन यांनी कमी पाण्यात, कमी कष्टात, कमी भांडवलात आंब्याची बाग घेण्याचा विचार केला. त्यांनी विटा, बेळुखी, सलगर (ता. मिरज) येथील डॉ. सरगर यांच्या बागेला भेट दिली.

इस्त्रायली पद्धतीने चार बाय बारा अंतराने अडीच बाय अडीच खड्डे काढून रोपांची लागवड केली, खड्ड्यांत थिमेट, निंबोळी पेंड, कॉम्प्लेक्स, मॅग्नेशियम घालून पालापाचोळा, शेणखत टाकले, पूर्ण दोन एकर क्षेत्राला ठिबक सिंचन केले. दीड फूट आंबा रोपांची लागवड केली. दोन एकरांत एक हजार आंब्याच्या रोपांची लागवड केली आहे. रामपूर गावाचा परिसर हा कायमचाच दुष्काळी आहे. पण, दोन कुपनलिका खोदून पाणी उपलब्ध केले. अत्यंत कमी पाण्यावर ठिबकच्या मतदतीने दोन एकर आंबा, दोन एकर द्राक्ष फळबागा केली आहे. यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

दोन एकर शेतीत १६ लाखांपर्यंत उत्पन्नआंबा पाडाला आल्यावर मोठे व्यापारी बांधावर जाऊन टनावर खरेदी करतात. विक्री व्यवहार रोखीने केला जातो. त्यामुळे विक्री व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येते. स्थानिक व्यापारी, खाऊ ग्राहक किलोवर विक्री होते. अनुकूल हवामानामुळे आंबा पीक बहरले आहे. दोन एकर क्षेत्रात १२ टन उत्पादन निश्चित मिळणार आहे. १५ ते १६ लाख रुपयाचे उत्पन्न मिळेल, असा विश्वास प्रगतिशील उच्चशिक्षित शेतकरी हर्षवर्धन कांबळे यांनी व्यक्त केला.

खडकाळ माळरानावर कमी खर्चात शाश्वत उत्पादन देणाऱ्या आंबा फळबागेबरोबर दोन एकर द्राक्षबागेची लागवड केली आहे. जत तालुक्यातील वातावरण आंबा पिकाला पोषक आहे, धोका कमी आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक पद्धतीने शेती केल्यास त्याचा फायदा होतो. - हर्षवर्धन कांबळे, तरुण शेतकरी, रामपूर, ता. जत

टॅग्स :आंबाशेतकरीइस्रायलफलोत्पादनपीकजाटशेतीपीक व्यवस्थापनलागवड, मशागतफळेद्राक्षे