यमन पुलाटे
जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर आपण यशस्वी उद्योजक होऊ शकतो. यासाठी गरज आहे ती चांगल्या मार्गदर्शनाची. जर ते मिळाले तर आपल्या व्यवसायाला उंच भरारी घेता येते.
अशीच भरारी अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी खुर्द (ता. राहता) येथील श्री स्वामी समर्थ बचत गटाच्या अध्यक्षा सुनीता सुधीर लांडे यांनी आपल्या आवळा प्रक्रिया उद्योगातून घेतली आहे. त्या स्वतः आत्मनिर्भर झाल्या आणि आपल्या गटातील महिलांनाही त्यांनी सक्षम केले आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जनसेवा फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील यांच्या प्रयत्नातून श्री स्वामी समर्थ महिला बचत गट लोणी खुर्द या ठिकाणी सुरू केला.
विविध प्रकारचे प्रशिक्षण, चर्चासत्र याशिवाय सहलीचे आयोजन करण्यात आले. यातून प्रेरणा घेत सुनीता लांडे यांनी आवळा प्रक्रियेवर काम सुरू केले. २००५ मध्ये जिल्हास्तरीय साई ज्योती प्रदर्शनात सुनीता लांडे यांनी सहभाग घेत प्रथमच आपली आवळा कॅन्डी या स्टॉलमध्ये विक्रीसाठी ठेवली. एका दिवसात पाच ते सहा हजार रुपयांचा व्यवसाय करत त्यांनी पहिल्याच प्रदर्शनात १५ ते २० हजार रुपये मिळवले.
आवळा प्रक्रियावरच आपल्याला विविध पदार्थ तयार करायचे या माध्यमातून त्यांनी ठिकठिकाणी प्रशिक्षण घेऊन आवळा कॅन्डी, आवळा ज्यूस, आवळा सरबत आवळ्याचे एक ना अनेक पदार्थ त्यांनी तयार केले आणि यातून उभा राहिला तो आवळा प्रक्रिया उद्योग.
आज या प्रक्रिया उद्योगातून त्यांच्याकडे बचत गटातीलच सात ते आठ महिला या बाराही महिने काम करत आहेत. पतीच्या निधनानंतर त्यांनी मुलांना उच्च शिक्षण तर दिलेच; परंतु अनेक महिलांना त्यांनी आधार दिला. आज या व्यवसायातून वर्षाकाठी लाखो रुपयांची उलाढाल सुनीता लांडे करतात.
कृषिमंत्री चौहान यांच्या हस्ते सन्मान
देशाचे कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांच्या उपस्थितीत लखपती दीदी म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला.
हेही वाचा : भारतातून कोणकोणत्या कृषी मालांची कुठे होतेय निर्यात? वाचा सविस्तर माहिती