Join us

Success Story : मुंबईतील नोकरीला फाटा देत धरली शेतीची कास; चंद्रकांतरावांचा मिश्र भाजीपाला उत्पादनाचा नावीन्यपूर्ण ध्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 16:01 IST

Farmer Success Story : कुडावळे येथील चंद्रकांत पांढरे यांचा वर्ष २०१२ मध्ये शेतीचा घेतलेला निर्णय 'शिवधनुष्य' होते, पत्नी चैत्रालीच्या मदतीने खडतर परिश्रम घेत त्यांनी शेतीमध्ये चांगली प्रगती केली आहे.

मेहरून नाकाडे 

दहावीपर्यंत गावात शिक्षण पूर्ण करून मुंबईला बारा वर्षे खासगी नोकरी केली. मात्र, गावाकडची ओढ असल्याने नोकरीला रामराम करून गावाला परत येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला.

रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील कुडावळे येथील चंद्रकांत पांढरे यांचा वर्ष २०१२ मध्ये शेतीचा घेतलेला निर्णय 'शिवधनुष्य' होते, पत्नी चैत्रालीच्या मदतीने खडतर परिश्रम घेत त्यांनी शेतीमध्ये चांगली प्रगती केली आहे.

चंद्रकांत बारमाही शेती करत असून विविध पिके घेत आहेत. केवळ शेतीच नाही, तर विक्रीचेही तंत्र त्यांनी अवगत केले आहे. शेतीतील त्यांचे उत्कृष्ट योगदानामुळे सेवाव्रती शिंदे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे त्यांना नुकताच आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

चंद्रकांत जेव्हा गावाकडे आले व शेतीचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांना संतोष मांडवकर यांचे मार्गदर्शन लाभले. सुरुवातीला त्यांनी खरीप हंगामात भात, नाचणी, वरी लागवडीसह चिबूड, काकडी, तसेच सर्व प्रकारच्या वेलवर्गीय भाज्यांची लागवड केली. शेतीमध्ये जम बसेपयर्यंत वर्ष २०१५ उजाडले. त्यानंतर मात्र शेतीचा विस्तार केला.

मुंबईत बारा वर्षे खासगी नोकरी केली; मात्र त्यानंतर गावात येऊन शेतीचा निर्णय घेतला. व्यावसायिक शेतीचे तंत्र अवगत केले आहे. ग्राहकांना काय हवे आहे, याचा अभ्यास करून शेतात लागवड करत आहे. - चंद्रकांत पांढरे, कुडावळे (दापोली).

स्टॉलवर होते विक्री

• गावात शेतमालाची विक्री करतानाच दापोली येथे बाजारात स्टॉल लावून करण्याचा निर्णय घेतला तेव्हा चंद्रकांत यांची पत्नी चैत्राली यांनी तयारी दर्शविली; परंतु स्टॉलवर एक, दोन भाज्या विक्रीला ठेवण्यापेक्षा जास्तीत जास्त भाज्या ठेवल्या तर ग्राहकांना एकाच ठिकाणी खरेदी करणे सुलभ होते; त्यासाठी शेतात विविध प्रकारच्या भाज्यांच्या लागवडीचे तंत्र उमगले.

• बारमाही शेतीमध्ये प्रत्येक हंगामात वेगवेगळ्या भाज्यांची लागवड करत आहेत. उन्हाळी मिरची व कलिंगड लागवड ते मोठ्या प्रमाणावर करतात. विशेष म्हणजे लागवडीसाठी रोपेही स्वतः तयार करतात. साडेतीन एकर क्षेत्रावर लागवड करतात. दर्जा चांगला असल्यामुळे शेतमाल विक्री हातोहात होत असल्याचे चंद्रकांत यांनी सांगितले.

हेही वाचा : Farmer Success Story : आधुनिक शेती तंत्रज्ञानाने साधली प्रगती; गोपालरावांची ८ एकरात ४८ लाखांची कमाई

टॅग्स :शेतकरी यशोगाथाशेतकरीशेती क्षेत्रबाजारभाज्यारत्नागिरी