Join us

शेतकऱ्याचा मुलाने उभारला कोट्यवधींचा उद्योग; प्रसंगी आईचं मंगळसूत्र गहाण ठेवलेल्या तरुणाची वाचा यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 20:16 IST

Success Story : 'उद्योजकतेचे स्वप्न पाहू नकोस ! ते आपल्यासाठी नाही,' असं वडिलांनी बजावलं होतं; पण आई प्रभा हिने दिलेल्या हजार रुपयाने त्याच्या स्वप्नाची सुरुवात झाली अन् आज त्याच रुपयांतून सुरू झालेलं पाऊल कोट्यवधींच्या अगरबत्ती साम्राज्यात रूपांतरित झालं आहे. ही यशोगाथा आहे ब्राह्मणी येथील आशिष (पिंटू) ज्ञानेश्वर निंबाळकर यांची.

जितेंद्र ढवळे

'उद्योजकतेचे स्वप्न पाहू नकोस ! ते आपल्यासाठी नाही,' असं वडिलांनी बजावलं होतं; पण मनातील ज्योत विझली नाही. यशाचा सुगंध त्याला खुणावत होता. ज्यातून आई प्रभा हिने दिलेल्या हजार रुपयाने त्याच्या स्वप्नाची सुरुवात झाली अन् आज त्याच रुपयांतून सुरू झालेलं पाऊल कोट्यवधींच्या अगरबत्ती साम्राज्यात रूपांतरित झालं आहे. ही यशोगाथा आहे कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी (जि. नागपूर) येथील शेतकरीपुत्र ३५ वर्षीय आशिष (पिंटू) ज्ञानेश्वर निंबाळकर यांची.

घरात फक्त दोन एकर कोरवाडवाहू शेती. वडील कळमेश्वरच्या खाजगी कंपनीत नोकरीवर होते; पण कंपनी बंद पडली आणि आयुष्याला मोठं वळण लागलं. हातात आलेल्या थोड्या पैशांत वडिलांनी शेती घेतली. यातच पिंटूचे शिक्षणही जेमतेम दहावीपर्यंत. पाचजणांचे कुटुंब. नोकरी मिळत नाही म्हणून वडिलांनी शेतीकडे वळायला सांगितलं; पण पिंटूला काहीतरी वेगळं करायचं होतं. तो कळमेश्वर येथील एका कंपनीत मशीन पुसण्याचं काम करू लागला.

१२ तास काम, महिन्याला फक्त ३ हजार रुपये. अंगावर घाम, पण मनात मात्र उद्योगाचं स्वप्न. वडिलांकडे त्याने छोटा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न बोलून दाखविले. मात्र त्यांनी विरोध केला. घरात दोन बहिणी लग्नाच्या होत्या. आई प्रभा हिला मुलाच्या स्वप्नावर विश्वास होता. तिने हजार रुपये हातावर ठेवले.

पिंटूने इतवारीतल्या व्यापाऱ्याकडून अगरबत्ती विकत घेतल्या. गोवोगावच्या आठवडी बाजारात विक्री सुरू केली. छोटंसं यश आलं; पण पुढे त्याने चॉकलेट विक्री सुरू केली आणि मोठं अपयश मिळालं. व्यापाऱ्यांचे पैसे फेडायचे होते. घरातील परिस्थिती बिकट. शेवटी आईचं मंगळसूत्र गहाण ठेवावं लागलं. त्यातून जुनी अगरबत्ती मशीन घेतली आणि तिथून खऱ्या उद्योगाचा प्रवास सुरू झाला.

शेकडो कुटुंबांना दिला आधार

निंबाळकर इंडस्ट्रीजमध्ये आज ४० कामगार थेट कार्यरत आहेत. त्याशिवाय नागपूर, भंडारा, गडचिरोली, अमरावती, धुळे, शिर्डी, छत्रपती संभाजीनगरातील ३००हून अधिक तरुण आणि महिलांना रोजगार मिळाला आहे. कोणी स्वतःची मशिन घेऊन उत्पादन करतो, तर कोणाचा माल थेट वाडी येथील उद्योगात प्रक्रिया व पॅकेजिंगसाठी पोहोचतो.

सुगंधात दडलेलं यश

फक्त पाच रुपयांचं छोटं पॅकेट ते ५०० रुपयांचा प्रीमियम पॅक असा बाजारपेठेतील प्रत्येक स्तर आज गाठला आहे. या दमदार कामगिरीमुळे पिंटू निंबाळकर यांनी राज्यातील 'सुगंध इंडिया' अगरबत्ती उद्योजकांच्या यादीत पहिल्या दहात स्थान पटकावलं आहे.

पहिल्या ऑर्डरपासून 'कादंबरी' पर्यंत, सहा राज्यांत दरवळतो सुगंध

२०१८-१९ मध्ये स्थानिक बाजारातून पहिल्या ऑर्डर आल्या. छोट्या अगरबत्ती उत्पादकांकडून तयार केलेला माल त्याने खरेदी करून त्यावर प्रक्रिया सुरू केली. व्यवसाय गती धरताच पिंटूचं अनुजा हिच्याशी लग्न झालं. पहिली मुलगी झाली. नाव ठेवलं कादंबरी. याच नावावर 'कादंबरी' अगरबत्ती नावाचा स्वतःचा ब्रेड उभारला. आज या ब्रँडचा सुगंध सहा राज्यांत दरवळतो आहे. महाराष्ट्र, बिहार, पंजाब, तेलंगणा, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांत निंबाळकर इंडस्ट्रीजची अगरबत्ती विकली जाते.

३२ बँड, दोन डेपो

आज बाजारात निंबाळकर अगरबत्ती इंडस्ट्रीजचे तब्बल ३२ ब्रँड बाजारात उपलब्ध आहेत. कादंबरी, ब्लॅक गोल्ड एक्स, श्रीरामायण, बिग मॅजिक, केदारनाथ, वाराणसी, महाकुंभ, सर्वज्ञ, अयोध्या, शुभ-लाभ हे काही लोकप्रिय बँड आहेत. आज पिंटू निंबाळकर यांचे वाडी (कारखाना) आणि पाटणा येथे डेपो आहेत. वार्षिक उलाढाल तब्बल पाच कोटींवर पोहोचली आहे.

आईच्या त्यागातून, संघर्षातून आणि स्वप्नावर विश्वास ठेवल्यामुळे एक तरुण आज शेकडो लोकांच्या उदरनिर्वाहाचं कारण बनला आहे. माझ्या आईनं दिलेला हजार रुपयांचा आशीर्वादच माझं खरं भांडवल होतं. बेरोजगार युवक, महिला, दिव्यांगांना छोटा व्यवसाय उभा करण्यासाठी आज माझ्या कंपनीचे दरवाजे उघडे आहेत. - आशिष (पिंटू) ज्ञानेश्वर निंबाळकर.

हेही वाचा : २० गुंठे क्षेत्रात मुंढे दाम्पत्याने घेतले टोमॅटो पिकातून १.५० लाखांचे उत्पन्न; पती-पत्नीच्या कष्टांना मिळाली बाजारभावाची साथ

टॅग्स :शेतकरी यशोगाथाशेती क्षेत्रव्यवसायनागपूरविदर्भमहाराष्ट्र