गोपाल माचलकर
वाशिम जिल्ह्याच्या तपोवन (ता. मंगरुळपीर) येथील आदर्श शेतकरी श्रीकृष्ण पाटील येवले यांनी आपल्या दीड एकर शेतावर एप्रिल २०२४ मध्ये पंधराशे पपईच्या झाडांची लागवड केली होती.
पपईसाठी कोणतेही रासायनिक खत किंवा फवारणी न करता नैसर्गिक खतांचा वापर न केल्यामुळे पपईला जास्त गोडवा मिळाला आहे. सध्या येवले यांच्याकडील या पपई फळांची त्यांनी शेलुबाजार परिसरात आपल्या स्वतःच्या दुकानातून विक्री सुरू केली आहे.
येवले यांनी तायवान जातीच्या पपईची लागवड एप्रिल महिन्यात केली होती. या पपईची देखभाल नैसर्गिक पद्धतीने शेणखत, गोमूत्र व अन्य नैसर्गिक खतांचा वापर करून करण्यात आली होती. या बागेतून नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पपईची काढणी सुरू झाली होती.
त्यावेळी सुरुवातीला ३० ते ३५ रुपयांचा दर येवले यांना मिळाला होता. तर नंतर जानेवारी महिन्यापासून दरात मंदी आल्याने २५ ते ३० रुपयांचा दर मिळत आहे. यापासून त्यांना जवळपास ३ ते ४ लाख रुपये मिळाले आहेत आणि अजून दीड ते दोन लाख रुपये मिळण्याची आशा त्यांना आहे.
कृषी विभागाचे लाभले मार्गदर्शन
मंगरूळपीर कृषी विभागाचे कृषी मंडळ अधिकारी शिवाजी अंभोरे, कृषी सहाय्यक अमोल हिसेकर, यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले असल्याचे येवले आवर्जून सांगतात.
व्यापाऱ्याला विकायची ठरवल्यावर त्याचे निम्मेच पैसे यायचे ज्यामुळे स्वतः शेतमाल विकण्याचा निर्णय घेतला व शेलुबाजार परिसरामध्ये दुकान थाटून हा शेतमाल विकत आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली असल्याने पपईचा दर्जा व गोडवा कायम आहे. त्यामुळेच फळांना परिसरात मागणी देखील अधिक आहे. आज रोजी जवळपास साडेतीन ते चार लाख रुपये या चिल्लर विक्रीमध्ये आम्हाला मिळालेले आहे. अजूनही दीड ते दोन लक्ष रुपये या पपईच्या पिकापासून होईल अशी आम्हाला आशा आहे. - श्रीकृष्ण येवले, शेतकरी, तपोवन.