मूळचा शेतकरी असणारा एक तरूण महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर स्पर्धा परिक्षांचा अभ्यास सुरू करतो, तो अनेक परीक्षा देतो पण अगदी काही मार्कांमुळे त्याला यश हुलकावणी देतं. कोरोनाकाळात पु्न्हा शेतीत रमतो पण अभ्यास मात्र सुरू असतो. पुन्हा नव्या दमाने परिक्षांना सामोरं जातो आणि अखेर पीएसआय पदाला गवसणी घातलो. ही कहाणी आहे शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या शैलेश लवांडे या तरूणाची.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा पहिल्यापासूनच दुष्काळी तालुका. येथील सिंगापूर हे एक खेडेगाव. नाव जरी 'सिंगापूर' असलं तरी हे आहे मूळ पुरंदर तालुक्यातील गाव. याच गावातील शेतकरी कुटुंबात शैलेशचा जन्म झाला. आई आणि वडील दोघेही पूर्णवेळ शेतकरी. त्याला एक भाऊ आणि तीन बहिणी असे पाच भावंडं. शैलेशने प्राथमिक माध्यमिक शिक्षण हे सिंगापूर आणि वाघापूर येथून पूर्ण केले.
पुढे त्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या साबळे फार्मसी कॉलेजमधून डी. फार्म ही पदवी पूर्ण केली. त्यांनतर मुक्त विद्यापीठातून बी.ए. राज्यशास्त्र या विषयात पूर्ण केले आणि २०१४ पासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. कौटुंबिक पार्श्वभूमी शेतीची असल्याने जो संघर्ष शेतकरी कुटुंबाच्या वाट्याला आला तोही त्याच्या नशिबात होता पण बंधू, बहिणी आणि दाजी यांची साथ त्याला मिळत गेली.
अभ्यास करत असताना यशाने अगदी जवळून अनेकदा हुलकावणी दिली. २०१६ मध्ये दुखापत झाल्याने परीक्षेतून बाहेर पडावे लागले. २०१७ ते २०२१ या कालावधीमध्ये एक आणि कधी चार मार्काने यश हुलकावणी देत होते पण हिंमत करून अभ्यास करणे सोडले नाही.
कोरोनाकाळात शहरे बंद पडली होती, प्रत्येकाने आपापले गाव गाठले होते. अशातच घरी राहून काय करायचे हा प्रश्न शैलेशसमोर होता. त्याने कोरोनामध्ये अंजीराची आणि इतर फळझाडांच्या रोपांची नर्सरी व्यवसायाला सुरूवात केली. पण हे सुरू असताना अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते.
त्यानंतर त्याने थेट पुणे गाठले आणि अभ्यासाला सुरूवात केली आणि २०२३ च्या परीक्षेत अखेर संघर्षाला पण नमावे लागले आणि २५ मार्चला लागलेल्या निकालात शैलेशची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. पूर्ण महाराष्ट्रातील ८० वी रँक घेऊन शैलेशने वर्दीचा मान मिळवला आहे.
या यशामध्ये त्याचे आईवडील, मोठा भाऊ, बहिणी आणि दाजींचा मोलाचा वाटा असल्याचं शैलेश अभिमानाने सांगतो. शेतीची पार्श्वभूमी असणाऱ्या शैलशने अधिकारी होण्यासाठी मागील एक दशक लढा दिला आणि अखेर तो दिवस उगवला. पोलिस उपनिरीक्षक शैलेश पुष्पा सुरेश लवांडे हे बिरुद लावण्याचा...!