Join us
Daily Top 2Weekly Top 5

एक एकर टोमॅटो शेतीतून ६ महिन्यांत ९ लाखांचा नफा; सुलतानवाडीतील शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 10:44 IST

Success Story : फुलंब्री तालुक्यातील सुलतानवाडी येथील दोन प्रगतशील शेतकऱ्यांनी केवळ एक एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड करून अवघ्या ६ महिन्यांत खर्च वजा जाता निव्वळ ९ लाख रुपयांचा नफा मिळविला आहे.

रऊफ शेख 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातील सुलतानवाडी येथील दोन प्रगतशील शेतकऱ्यांनी केवळ एक एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड करून अवघ्या ६ महिन्यांत खर्च वजा जाता निव्वळ ९ लाख रुपयांचा नफा मिळविला आहे.

सुलतानवाडी येथील शेतकरी साहेबराव रामभाऊ बखळे व राधाकिसन गोपीनाथ शिंदे यांनी एकत्र येऊन उन्हाळी आणि खरीप या दोन हंगामांत टोमॅटो लागवड केली. त्यांनी पहिली लागवड २० एप्रिल २०२५ रोजी तर दुसरी लागवड २० सप्टेंबर २०२५ रोजी केली. एकत्रितपणे रासायनिक खते, औषध फवारणी, कामगार मजुरी आणि देखभाल यावर सुमारे १ लाख ७५ हजार रुपये खर्च आला.

दरम्यान, बाजारात टोमॅटोची आवक घटल्याने किमतींनीही चांगली उंची गाठली आहे. एकच महिन्यात प्रतिकॅरेट टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली. मागील महिन्यात २०० रुपये असलेले कॅरेट या महिन्यात १ हजार ५० ते १ हजार १५० रुपये दराने विकले जात आहेत. दरातील या वाढीचा थेट फायदा सुलतानवाडीच्या शेतकऱ्यांना झाला.

त्यांनी आपले टोमॅटो कन्नडच्या बाजार समितीमध्ये विकले. त्यानंतर त्यांना ६ महिन्यांत सर्व खर्च वजा जाता ९ लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. टोमॅटोचे वेळेवर घेतलेले उत्पादन व बाजारभाव याचा दुहेरी लाभ सुलतानवाडीचे शेतकरी बखळे व शिंदे यांना झाला आहे.

पिकाचे योग्य नियोजन केल्याने यश

• ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळीमुळे द्राक्ष फुलोऱ्याला मोठा फटका बसला; मात्र टोमॅटोचे पीक वाचले.

• ढगाळ हवामानामुळे फुलगळ, करपा आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असतानाही या शेतकऱ्यांनी योग्य वेळी औषध मात्रा आणि फवारणीचे नियोजन करून पीक संरक्षण केले.

• उपचार पद्धतीत काटेकोरता राखल्याने टोमॅटो उत्पादन कमी न होता उलट वाढले.

हेही वाचा : पारंपरिक भातशेती, भाजीपाला आणि ७५ शेळ्यांच्या कळपातून शेखरने निर्माण केले रोजगाराचे नवे मॉडेल

टॅग्स :शेतकरी यशोगाथाबाजारटोमॅटोशेतकरीशेतीशेती क्षेत्रभाज्याछत्रपती संभाजीनगर