Join us

पिकाचे योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत हिवरखेडच्या प्रशांतरावांनी घेतले टरबूजचे विक्रमी उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 13:11 IST

Agriculture Success Story : युवा शेतकरी प्रशांत मोहन हटकर (Prashant Mohan Hatkar) यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर सव्वा एकर जमिनीत ४८ टन टरबूज (Watermelon) उत्पादन घेऊन तब्बल तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

अनिल गवई 

बुलढाणा जिल्ह्याच्या हिवरखेड (ता. खामगाव) येथील युवा शेतकरी प्रशांत मोहन हटकर यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर शेतीत नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.

केवळ सव्वा एकर जमिनीत ४८ टन टरबूज उत्पादन घेऊन तब्बल तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. त्यांच्या या अपूर्व यशामुळे अनेक तरुण शेतकऱ्यांसाठी नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.

अवघ्या ७० दिवसांत भरघोस उत्पादन!

प्रशांत हटकर यांनी फक्त ७० दिवसांत ४८ टन टरबूज उत्पादन घेतले. विशेष म्हणजे, त्यांच्या शेतात अद्याप ४ ते ५ टन टरबूज विक्रीसाठी शिल्लक आहे.

आधुनिक तंत्रज्ञान आणि नियोजन - यशाचा मंत्र !

राज्यातील अनेक भागांत प्रतिकूल हवामानामुळे टरबूज उत्पादक अडचणीत आले असताना, योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रशांत यांनी हे यश मिळवले.

कमी खर्च, अधिक नफा!

टरबूज लागवडीसाठी प्रशांत यांनी अवघे २८ हजार रुपये गुंतवले, तर खते आणि सिंचनासाठी ४१ हजार रुपये खर्च केला. तोडणी आणि इतर खर्च मिळून एकूण खर्च फक्त एक लाख रुपयांपर्यंत पोहोचला. मात्र, उत्पादनाच्या तुलनेत हा खर्च अत्यल्प ठरला आणि त्यांना मोठा नफा मिळवता आला.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन

प्रशांत हटकर यांचे सोबतच नायदेवी येथील संतोष कोल्हे यांना भरघोस उत्पादन झाले आहे. त्यांनी टारगेट या वाणाचे टरबुज पीक घेतले होते. त्यांना महादेव हटकर यांनी योग्यवेळी मार्गदर्शन केले, तसेच इतर शेतकऱ्यांना देखील लाभ झाला.

बदलत्या हवामानात शेती करणे आव्हानात्मक आहे. मात्र, आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रोक्त शेती पद्धती आणि योग्य नियोजनाच्या जोरावर भरघोस उत्पन्न घेता येते. - प्रशांत हटकर, युवा शेतकरी, हिवरखेड.

हेही वाचा : संसाराच्या गाड्याला 'ती'ने दिला खांदा; बचत गटाच्या मदतीने कविताताईंचा उद्योग विश्वात खारीचा वाटा

टॅग्स :फळेभाज्याशेतकरी यशोगाथाशेतीबाजारअकोलाविदर्भशेती क्षेत्र