महेश घोलपओतूर: शेतात वेगवेगळे प्रयोग करत चांगले उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आता वाढ होत आहे. यामुळे शेतीतून चांगले उत्पादन घेऊन शेतकरी फायदा करून घेत आहेत.
यातच ओतूर येथील एका शेतकऱ्याने शेतात शुगर फ्री असलेल्या लाल केळीचे लागवड करण्याचा प्रयोग केला. शेतकऱ्याचा हा प्रयोग यशस्वी ठरला असून यातून चांगले उत्पादन या शेतकऱ्याला मिळत आहे.
जुन्नर तालुक्यातील मांडवी खोऱ्यातील ओतूर येथील प्रगतशील शेतकरी शरद आनंथा फापाळे यांनी केळी हेपीक आपल्या माळरानावरील काळी भुरकट एक एकर क्षेत्रात घेतले असून लाल केळी या जातीचे १००० रोपे लागवड केली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी केळीचे उत्पादन घेतले आहे.
या पिकाला सद्याचे बाजारभाव पाहता ७० रूपये किलोला मिळत आहेत आज जर विचार केला तर आज मितीला केळी इतके पैसे कोणत्याच दुसऱ्या पिकात मिळत नाहीत असे त्यांना वाटू लागले म्हणून गेली कित्येक वर्षापासून जुन्या पिढ्यांन पासून केळीचे उत्पन्न घेत असून ही परंपरा जपली असून कित्येक वर्ष केळी हे पीक ते आपल्या शेतात सफल करत आहेत.
पाहिले शेतीची मशागत करून त्यात २ ट्रोली शेणखत टाकून बेड पाडून वर डबल पद्धतीने ठिबक सिंचन करून बेडवर ४ फुट रुंदीचे ७/६ अंतर सोडून केळी लागवड केली.
संभाजीनगर येथून २५ रुपये प्रति १ रोप प्रमाणे रोपे आणली. १५ मार्च २०२४ रोजी लागवड केली आता केळी १२ महिन्याच्या होऊन गेल्या आहेत केळीला ५ ते ६ फण्या तर १४ महिन्याच्या केळी झाल्यावर अंदाजे १५ ते १८ किलोचा लंगर होईल असे वाटते.
गेली २५ वर्ष मी स्वतः केळीचे उत्पन्न घेत आहे कधी मला आतापर्यंत केळी पिकातून तोटा झाला नाही केळी हे पीक परवडणारे आहे पण सद्या लाल केळीचे उत्पन्न पहिल्यांदा घेतले आहे त्यातून दीड ते पावणे दोन टन उत्पादन मिळेल असा अंदाज आहे.
आताचे भाव परवडणारे आहेत. सद्या केळी काढणी सुरू केली असून मुंबई फ्रुट मार्केटला ७० रूपये किलो भाव मिळत आहे. आतापर्यंत १ एकर केळी क्षेत्राला भांडवल सरासरी ८० ते ९० हजार गेले आहेत.
आताच्या बाजारभावात केळी हे पीक चांगली मेहनत घेतली व योग्य नियोजन केले खताच्या व पाण्याच्या मात्रा वेळोवेळी देत राहिलो तर उत्पादन चांगल मिळते व त्यातून चांगला नफा होतो.
अंदाजे केळी पिकातून आताच्या बाजारभावात एवढ्या उष्ण तापमानात मुरमाड जमिनीतूनही चागलं केळी उत्पन्न मिळते तेही कमी खर्चात, गेली कित्येक वर्ष वडीलोपार्जित केळी लागवड करीत असून मला केळी लागवडीची आवड आहे असे फापाळे यांनी सांगितले.
शुगर फ्री केळी उत्पादन घेण्याबाबत वर्षभर अभ्यास केला. दोन वर्षापासून सोलापूर येथे काही शेतकरी उत्पादन घेत आहेत. त्याची मुलाखत ऐकून वाटले की आपणही हे उत्पन्न घेऊ शकतो ज्यामध्ये नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण कमी असते.
मधुमेह रुग्ण आणि आरोग्याबाबत जागरूक लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. पण याबाबत अजून जनजागृती नसल्याने इतर केळीप्रमाणेच या लाल केळीला सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
या केळी विषयी जनजागृती झाल्यास सर्वसाधारण केळीपेक्षा तीन ते चार पटीने अधिक बाजारभाव मिळू शकतो त्यामुळे मी स्थानिक कृषी तज्ज्ञांच्या मदतीने लाल केळी करायच्या ठरवल्या त्यानुसार लागवड करण्याचा निर्णय घेतला.
हा प्रयोग शेतीतील नवसंशोधनाचा उत्तम नमुना आहे. शुगर-फ्री लाल केळी शेतकऱ्यांना बाजारात वेगळी ओळख मिळेल आणि ग्राहकांना पौष्टिक पर्याय उपलब्ध होईल.
या केळीच्या उत्पादनासाठी कमी पाणी आणि सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला. ज्यामुळे पर्यावरणपूरक शेतीलाही चालना मिळाली आहे.
लाल केळीची ही खास जात केवळ रंगाने आकर्षक नाही, तर लाल केळीची खासियत म्हणजे त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पारंपरिक केळीच्या तुलनेत या जातीत ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. केळीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांचे प्रमाणही जास्त असल्याने त्याला बाजारात चांगली मागणी आहे. - गणेश भोसले जुन्नर तालुका कृषी अधिकारी
मधुमेह रुग्णांसाठी लाला केळी ही पर्वणी ठरू शकते त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी एक नवीन पिकाचा पर्याय उपलब्ध होऊन केळीचे क्षेत्र या नवीन बदलामुळे पुन्हा एकदा वाढू शकते आणि याचा निश्चितपणे फायदा जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना होईल शेतकऱ्यांनी भविष्यात या संधीचा अभ्यास करून लाभ घ्यावा. - ऋषिकेश नरेंद्र तांबे, कृषीतज्ञ
अधिक वाचा: खोरच्या युवा शेतकऱ्याचा कलिंगड उत्पादनात विक्रम; आंतरपीक म्हणून मिरचीचा यशस्वी प्रयोग