स्पर्धा परीक्षेचा नाद सोडून गावी परतलेला सोलापुरातील एक तरुण आज शेती करता करता आपल्याच शेतातील पिकवलेली केळी निर्यात करत आहे. घरच्या पारंपारिक शेतीला फळबागांमध्ये रूपांतरित करून हा तरुण आज वर्षाकाठी करोडोंची उलाढाल करत आहे. स्पर्धा परीक्षेसाठी अर्ध आयुष्य घालवणाऱ्या तरुणांसाठी हा एक आदर्श आहे. ही गोष्ट आहे केतुर नं.२ (ता. करमाळा) येथील तरुण विनोद नवले याची.
विनोदने साधारण दोन वर्षांपूर्वी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सोडून गाव गाठलं. वडिलोपार्जित जवळपास ८० एकर जमीन होती. पण त्यामध्ये प्रामुख्याने ऊस हे पीक घेतले जायचे. आपल्या शेतातील क्रॉप पॅटर्न बदलण्याच्या अनुषंगाने विनोदने केळी, पेरू, कलिंगड, झेंडू अशा पिकांची लागवड केली. यामध्ये त्याला चांगला नफा मिळू लागला.
उजनी धरणाचे पाणी उपलब्ध असल्याने या भागामध्ये केळी पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे विनोदने केळी या पिकावर लक्ष केंद्रित केले आणि निर्यातक्षम केळी उत्पादनाला सुरुवात केली. त्याने आपल्या शेतात वेलची (गावरान) केळी लागवडीचा सुद्धा प्रयोग यशस्वी करून दाखवला आणि मागच्या काही महिन्यांपासून केळी निर्यात करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीच्या काळात शेतमाल निर्यात करणाऱ्या कंपन्यांना तो केळी पुरवायचा. परंतु त्यानंतर अजय गोसावी या मित्राला सोबत घेत त्याने केळी निर्यात करण्यासाठी एका कंपनीची स्थापना केली आणि निर्यातक्षम केळीचा पहिला कंटेनर ओमान या देशात पाठवला. या दोन तरुण मित्रांनी सुरू केलेला व्यवसाय आता जोरात सुरू आहे. यासोबतच त्यांना जॉर्डन, इराण, इराक या देशातून सुद्धा केळीच्या ऑर्डर आलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात तिथे सुद्धा ते केळीची निर्यात करणार आहेत.
शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जे पिकवले आहे ते विकण्याची कला त्यांना जमली पाहिजे असं विनोद नेहमी सांगतो. याआधीही त्याने स्वतःच्या शेतात पिकवलेला झेंडू विकून एका रात्रीत ३ लाख रुपये कमावले होते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सोडून शेतीमध्ये यशस्वी ठरलेला विनोद चा प्रवास इतर तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
"येणाऱ्या काळात विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना निर्यातक्षम केळी उत्पादित करण्यासाठी काम करायचे आहे. आपल्या शेतातच एकरी शंभर टना पेक्षा जास्त केळी उत्पादनाचे विविध प्रयोग सुरू आहेत. हे प्रयोग यशस्वी झाले तर शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येईल" - विनोद नवले.