बालाजी आडसूळ
आजही अनेक ठिकाणी महिलेला शेतीच्या कामात दुय्यम स्थान दिले जाते. मात्र कळंब तालुक्यातील मस्सा ख. येथील आशा बाळकृष्ण सावंत यांनी गेल्या वीस वर्षांपासून ही समजूत मोडून काढत शेतीत स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. (Women Farmer Success Story)
'चूल आणि मूल' या चौकटीत अडकवून ठेवलेल्या महिलांसाठी आशाबाई आज प्रेरणास्थान ठरत आहेत. (Women Farmer Success Story)
वीस वर्षांपासून शेतीची संपूर्ण धुरा
आशा सावंत यांच्या कुटुंबात पती बाळकृष्ण सावंत, सासरे आणि दोन मुले असा परिवार आहे. पती खासगी लेखापरीक्षणाचे काम करतात, तर मुले शिक्षणासाठी बाहेरगावी असतात. अशा परिस्थितीत घर, शेती आणि व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी आशाबाईंनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे.
गेल्या वीस वर्षांपासून त्या स्वतः शेती कसत असून, पेरणीपूर्व मशागत, उन्हाळी नांगरट, पेरणी, आंतरमशागत, कीड-रोग नियंत्रण, काढणी, मळणी ते थेट बाजारात विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्या स्वतः निर्णय घेतात.
शेती म्हणजे नोकरीच!
'शेतीकडे अकारण दुय्यम नजरेने पाहिले जाते. माझ्यासाठी शेती म्हणजे एक जबाबदारीची नोकरीच आहे.' असे आशाबाई ठामपणे सांगतात.
त्या रोज पहाटे उठून घरातील सर्व कामे उरकतात. सकाळी दहा वाजता शेताचा रस्ता धरतात. चार कायम महिला मजुरांसोबत त्या स्वतः राबतात. पिकांची निवड, बियाण्यांची गुणवत्ता, खत-औषध व्यवस्थापन याबाबत कोणाच्याही दबावाला बळी न पडता त्या अभ्यासपूर्वक निर्णय घेतात.
प्रयोगशील शेतीचा यशस्वी प्रवास
आशाबाईंची शेती म्हणजे केवळ पारंपरिक शेती नाही, तर प्रयोगशील आणि दूरदृष्टीची शेती आहे.
सात एकर क्षेत्रात त्यांनी यशस्वीपणे डाळिंबाची बाग उभी केली होती. तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे ती बाग मोडावी लागली, तरीही त्या खचल्या नाहीत. सध्या तीन एकरांत केळीचे पीक जोमाने उभे आहे.
याशिवाय 'ब्राझील राजमा' हे नवे पीक तब्बल २ ते ७ एकर क्षेत्रात घेत त्यांनी परिसरात लक्ष वेधून घेतले आहे. अधूनमधून फुलशेतीही करून त्या शेतीला वैविध्य देतात.
पाण्याचे नियोजन, यांत्रिकीकरणावर भर
तीन विहिरी आणि दोन बोअरवेल्सच्या पाण्याचा काटेकोर वापर करून आशाबाई पीक व्यवस्थापन करतात. शेतीतील खर्च कमी करण्यासाठी आणि वेळेचे नियोजन साधण्यासाठी त्यांनी कृषी यांत्रिकीकरणावर भर दिला आहे.
ट्रॅक्टर चालवणे, नांगरणी, पेरणी, काढणी यांसारखी कामे त्या स्वतः करतात. चालक ते मालक असा त्यांचा प्रवास अनेक पुरुष शेतकऱ्यांनाही प्रेरणा देणारा आहे.
नारीशक्तीचा ठोस पुरावा
ट्रॅक्टरचे स्टेअरिंग हातात घेतलेली आशाबाई पाहिली की, 'नारी अबला नाही, सबला आहे' हे वाक्य अक्षरशः जिवंत होते.
घरातील जबाबदाऱ्या सांभाळत, शेतीतील कठोर श्रम स्वीकारत आणि सतत नव्या प्रयोगांतून उत्पादन वाढवत आशाबाईंनी डाळिंब, केळी, ब्राझील राजमा अशा विविध पिकांतून चांगलीच समृद्धी साधली आहे.
प्रेरणादायी कर्तृत्व
आज आशा सावंत यांची ओळख केवळ शेतकऱ्याची पत्नी म्हणून नाही, तर एक स्वयंसिद्ध, कर्तृत्ववान महिला शेतकरी म्हणून आहे.
नांगरणीपासून पेरणी, पेरणीपासून कापणीपर्यंत सर्व शेतीकामे यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून करत स्वतः निर्णय घेणाऱ्या आशाबाईंची ही यशकथा अनेक महिलांसाठी नवी दिशा देणारी आहे.
