शरद वाघमारे
अर्धापूर तालुक्यातील सावरगाव हे साधं, शांत, ग्रामीण जीवन जगणारं एक छोटं गाव. इथल्या मातीत कष्ट मिसळलेले, तर लोकांच्या स्वप्नात धडपड. अशाच कष्टांच्या मातीत वाढलेला सतीश जगन्नाथ आबादार शेतकरी कुटुंबातील एक तरुण आज 'भारतीय रेल्वेतील लोको पायलट' म्हणून आपलं स्वप्न साकार होताना पाहतोय.(Success Story)
लहानपणीच ओळखला कष्टांचा खरा अर्थ
सतीशचे बालपण चार एकर संयुक्त शेतीवर अवलंबून. शेतीतील उत्पन्न कमी, पण कुटुंबातील गरजा मोठ्या. हीच परिस्थिती त्याला लहानपणीच समजली.'फक्त शेतीच्या आधारावर जगणं कठीण आहे… आयुष्यात काहीतरी वेगळं करायलाच हवं,' ही जाणीव त्याच्या मनात घर करून बसली.
आई-वडिलांचे कष्ट प्रत्यक्ष पाहणाऱ्या सतीशलाच लहानपणीच कळून चुकलं की, संघर्ष टाळता येत नाही… पण त्यावर मात करता येते.
आईटीआयपासून स्वप्नाच्या दिशेने वाटचाल
२०२०-२२ या कालावधीत सतीशने आयटीआयमध्ये डिझेल मेकॅनिक ही पदवी पूर्ण केली. अभ्यास करताना त्याला मशीन, इंजिन याबद्दलची आवड अधिकच वाढली.
डिझेल मेकॅनिक झाले म्हणजे उद्योगात नोकरी मिळू शकली असती, पण सतीशचं मन दुसरीकडेच होतं. भारतीय रेल्वेत लोको पायलट बनण्याचं स्वप्न पाहिलं.
गावातच राहून अभ्यास; जिद्दीचा अनोखा मार्ग
इतर मुलांसारखे मोठ्या शहरात जाण्याऐवजी त्याने गावातच राहून अभ्यास करण्याचा निश्चय केला. मोठ्या स्पर्धा परीक्षा, लाखो उमेदवार हे सगळं माहीत असताना त्याने मागे वळून पाहिलं नाही.
दिवसा शेतीत आई-वडिलांना मदत, रात्री अभ्यास हा त्याचा दिनक्रम होता.
गावातील शांत वातावरण, घरच्यांचा आधार आणि स्वतः वरचा विश्वास यांनी त्याच्या मेहनतीला वेग दिला.
मेहनतीला मिळाला यशाचा मुकुट
सततच्या अभ्यासानंतर अखेर त्याच्या हातात आली भारतीय रेल्वेत 'लोको पायलट' पदाची निवडपत्रिका!
घरात आनंदाचा जल्लोष. आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी अभिमानाचं, समाधानाचं आणि सुखाचं!
सतीशचं यश म्हणजे अनेक तरुणांसाठी प्रेरणा
कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मेहनत, जिद्द आणि संयम असणं आवश्यक. परिस्थिती काहीही असो… जर तुम्ही ठरवलं, तर यश मिळतंच.-सतीश जगन्नाथ आबादार
त्याच्या या प्रवासातून ग्रामीण तरुणांना एक स्पष्ट संदेश मिळतो
स्वप्न मोठं असू द्या… पण त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी देखील मोठी असू द्या.
सावरगावचा लेक आता देशाच्या लोहमार्गावर!
आज सतीश भारतीय रेल्वेच्या गाड्यांना दिशा देतोय. एका शेतकरी कुटुंबातील मुलाने खडतर मातीपासून लोहमार्गापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आणि संपूर्ण गावाचा मान उंचावला. सावरगावच्या मातीतून उमललेली एक प्रेरणादायी कथा म्हणजे जिद्द, चिकाटी, संघर्ष आणि यशाचा सुंदर संगम आहे.
