Soybean Success Story : अतिवृष्टी आणि अनिश्चित हवामानानं बहुतेक शेतकऱ्यांना फटका बसला, पण पळसखेड (ता. चांदूर रेल्वे) येथील सागर घटारे यांनी विज्ञाननिष्ठ आणि नियोजनबद्ध शेतीच्या बळावर एकरी तब्बल १२ क्विंटल सोयाबीन उत्पादन घेतलं. (Soybean Success Story)
आधुनिक तंत्रज्ञान, योग्य वाण निवड, आणि वेळेवर केलेल्या फवारण्यांमुळे त्यांनी प्रतिकूल हवामानातही विक्रमी यश मिळवून शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलं आहे. (Soybean Success Story)
चांदूर रेल्वे तालुक्यातील पळसखेड (जि. अमरावती) येथील तरुण शेतकरी सागर घटारे यांनी अतिवृष्टी, पावसाचे अनियमित प्रमाण आणि प्रतिकूल हवामानावर मात करत एकरी तब्बल १२ क्विंटल सोयाबीन उत्पादन घेऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे. (Soybean Success Story)
सागर घटारे हे बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स पदवीधर असून, शिक्षणासोबत त्यांनी शेतीकडे वळताना आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञानाधारित नियोजन आणि शाश्वत शेतीची वाट निवडली. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि नियोजनबद्ध कामगिरीमुळे शेतात 'लक्ष्मी प्रसन्न' झाली आहे. (Soybean Success Story)
शास्त्रीय नियोजनानं दिलं यश
अतिवृष्टीमुळे बहुतेक शेतकऱ्यांना एकरी एक-दोन क्विंटल उत्पादन मिळाले, तर सागर यांनी त्यांच्या शेतात काटेकोर नियोजन करत उच्च प्रतीचे सोयाबीन उभारले.
शेतीतील यशाचे गमक
* पेरणीनंतर ४८ तासांत तणनाशक फवारणी केली, त्यामुळे तण नियंत्रण झाले.
* १५ दिवसांच्या अंतराने चार कीटकनाशक फवारण्या करून पिकावर कीड बसू दिली नाही.
* बुरशीनाशक फवारणी वेळेवर करून रोगांपासून बचाव केला.
* अतिवृष्टीच्या काळात शेतात निचऱ्याची सोय करून पाणी साचू दिलं नाही.
* हवामान अंदाजावर आधारित निर्णय, म्हणजे कधी पाणी द्यायचं, कधी फवारणी करायची, हे आधीच नियोजित केलं.
वाण निवड आणि उत्पादनातली शहाणपणाची गुंतवणूक
सागर यांनी पांढऱ्या फुलाच्या उच्च प्रतीच्या सोयाबीन वाणाची निवड केली. मागील काही वर्षांत वापरले जाणारे ३३५ आणि ९३.०.५ वाण हवामानामुळे उतारीत मागे पडले, त्यामुळे सागर यांनी नवा प्रयोग करून उत्पादन वाढवले.
चार एकर शेतात ७८ कट्टे (एकरी १२ क्विंटल) इतकं उत्पादन घेऊन त्यांनी जिल्ह्यात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
नफा आणि पुढील दिशा
सध्या सागर घटारे यांचं सोयाबीन वाळवणीच्या प्रक्रियेत असून, ते नाफेडमार्फत विक्रीसाठी उत्सुक आहेत. योग्य भाव मिळाल्यास त्यांचा उत्पादन खर्च वजा करून चांगला नफा अपेक्षित आहे.
इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा
सागर घटारे यांच्या या यशकथेने जिल्ह्यातील आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलं आहे.
नियोजन, वेळेवर कृती आणि प्रयोगशील वृत्ती हेच आधुनिक शेतीचे यशाचे तीन मंत्र आहेत.
शेती विज्ञानाशी जोडली, तर हवामान कोणतंही असो उत्पादन निश्चित मिळतं, यावर माझा विश्वास आहे. - सागर घटारे, शेतकरी
