- गोपाल लाजूरकर
जिद्द, सातत्य आणि स्वयंअध्ययनाच्या बळावर देसाईगंजशी नाळ जुळलेल्या सोनाली कुंदा अरविंद मेश्राम यांनी २०२४ च्या कृषी सेवा परीक्षेत राज्यात ४५ वी रैंक मिळवत उपविभागीय कृषी अधिकारी पदावर झेप घेतली.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखला येथील सोनाली या सेवानिवृत्त शिक्षक अरविंद मेश्राम व कुंदा मेश्राम यांची कन्या. त्यांचे मामा अरविंद भिकाजी गोंडाणे हे देसाईगंज येथील रहिवासी असल्याने सोनाली यांची नाळ या शहराशी घट्ट जुळली आहे. परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल जाणून घेऊ या मुलाखतीतून....
प्रश्न : शैक्षणिक प्रवासाबद्दल काय सांगाल ?
उत्तर : माझे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण तुमसर येथे झाले. इयत्ता ११ वी व १२ वीचे शिक्षण लाल बहादूर शास्त्री ज्युनिअर कॉलेज भंडारा येथे पूर्ण केले. त्यानंतर बीएस्सी (अॅग्री.) नागपूर येथे व एमएस्सी (अॅग्री.) महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पूर्ण केले. कीटकशास्त्र विषयात मला सुवर्णपदक मिळाले, हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता.
प्रश्न : परीक्षेची तयारी कशी केली?
उत्तर : कृषी सेवा परीक्षा २०२४ मध्ये परीक्षा दिली. राहुरी येथेच राहून अभ्यास केला. कोणत्याही प्रकारची खासगी शिकवणी घेतली नाही. वर्णनात्मक प्रश्नोत्तरांचा नियमित सराव, टेस्ट सिरीज सोडविणे, मनन-चिंतन आणि अभ्यासाचे सातत्य यावर भर दिला. अंतिम निकाल १० फेब्रुवारी रोजी लागला. नियोजनबद्ध अभ्यासामुळेच राज्यात ४५ वी रैंक मिळवता आली.
प्रश्न : प्रेरणा आणि मार्गदर्शन कोणी दिले?
उत्तर : माझी बहीण डॉ. अंजली अभय गोंडाणे आणि मैत्रीण ऋतुजा बगाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आई कुंदा आणि वडील अरविंद मेश्राम यांनी कायम अभ्यासासाठी प्रेरणा दिली. वडील शिक्षक असल्याने शिस्त आणि अभ्यासाची सवय लहानपणापासूनच लागली. शेतकऱ्यांना योजनांच्या माध्यमातून सक्षम करणे हा उद्देश आहे.
प्रश्न : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना काय सांगाल?
उत्तर: स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मानसिक आरोग्य जपावे. अभ्यासात सातत्य, कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी. मित्र-मैत्रिणींचीही साथ महत्त्वाची आहे. अपयश येईल, तेव्हा संयम ढळू देऊ नये. जोमाने अभ्यासाला सुरुवात करावी. यश नक्कीच मिळेल.
