- लिकेश अंबादे
गडचिरोली : तालुक्याच्या बेडगाव येथील सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक अशोक पुसाराम कराडे यांनी शेतीतून नवा आदर्श निर्माण केला आहे. सेवानिवृत्तीनंतरही धानपिकासह पालेभाज्या, कडधान्य आणि फळबागेतून पाच ते सहा लाखांपर्यंत उत्पन्न मिळवतात. शेतात विविध पिके व शेतीपूरक व्यवसायाबाबत ते मार्गदर्शन करत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरले आहेत.
अशोक कराडे यांनी पोलिस खात्यात १९९० रोजी शिपाई म्हणून काम सुरू केले, पदोन्नतीत पोलिस उपनिरीक्षक झाले आणि ५८ वर्षांच्या वयात सेवानिवृत्त झाले. मागील दोन वर्षापासून त्यांनी पूर्णवेळ शेती सुरू केली असून, साडेसात एकर जमिनीवर धान, हरभरा, तूर, भाजीपाल्याची लागवड करत आहेत. अशोक कराडे यांची पत्नी वैजंती जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. मुलगा स्वप्निल मेकॅनिक अभियंता, मुलगी स्नेहा संगणक अभियंता आणि दुसरी मुलगी नम्रता मुंबईत दंतचिकित्सक आहे. घरात उच्च शिक्षणासह श्रममूल्यही रुजले आहे.
१५ शेतकऱ्यांना प्रशिक्षण, आधुनिक शेतीचा कित्ता
सेवानिवृत्त अशोक कराडे स्वतः राबवत असल्याने परिसरातील १०-१५ शेतकऱ्यांनीही त्यांच्या मार्गदर्शनाखाली धान, हरभरा, तूर आणि पालेभाज्यांपासून जास्त उत्पन्न मिळवणे सुरू केले आहे. अनेक शेतकरी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आधुनिक व नफ्याची शेती कसत आहेत. शेती कसण्याकडे पावले उचलल्याने इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत आहे.
दुग्ध व्यवसायासह सुरू केले कुक्कुटपालन
अशोक कराडे यांच्याकडे सध्या दोन दुधाळ गायी, शेळ्या व २०० गावरान कोंबड्या आहेत. पुढे मोठ्या प्रमाणावर दुधाळ गायी, शेळीपालन आणि कुक्कुटपालन करून अधिक उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा मानस आहे. कुक्कुटपालन व्यवसायामुळे त्यांना नियमित उत्पन्न प्राप्त होत असून इतरही शेतकऱ्यांना कृषीपूरक व्यवसायासाठी ते मार्गदर्शन करत आहेत.
धान, भाजीपाल्याचे उत्पन्न, १५० झाडांची फुलविली फळबाग
अशोक कराडे हे धानपिकातून दरवर्षी साडेतीन लाखांचे उत्पन्न घेतात. याशिवाय ते पालेभाज्या व कडधान्यांतून प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे उत्पादन होते. त्यांनी शेतात नवीन १५० झाडांची फळबाग फुलविली आहे. यात आंबा, दशेरी, बेंगनपल्ली, चिकू, संत्रा, लिंबू, मोसंबी, मुंगना आदी रोपटी आहेत. येथून उत्पन्न मिळण्याची प्रतीक्षा आहे.
