Organic Mango Success Story : दुष्काळी परिस्थिती, डोंगराळ जमीन आणि मर्यादित साधनसंपत्ती… या सगळ्या अडचणींवर मात करत लक्ष्मण जोगदंड यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि सरकारी योजनांच्या मदतीने शेतीत यशाचे नवे उदाहरण निर्माण केले आहे. (Organic Mango Success Story)
अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा येथील या शेतकऱ्याने डोंगरदऱ्यातील माळरानावर आंब्याची बहरलेली आमराई उभी करत वर्षाकाठी दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवले आहे.(Organic Mango Success Story)
डोंगराळ जमिनीतून उभी केली फळबाग
लक्ष्मण जोगदंड यांच्याकडे एकूण ८ एकर जमीन आहे. मात्र ही जमीन डोंगराळ आणि कोरडवाहू असल्याने पारंपरिक शेती करणे कठीण होते.
कमी पाऊस आणि पाण्याअभावी शेतीत फारसे उत्पन्न मिळत नव्हते. अशा परिस्थितीत त्यांनी शेतीत काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला.
सुमारे १० वर्षांपूर्वी त्यांनी कृषी विभागाच्या फळबाग लागवड योजनेत सहभाग घेतला. या योजनेच्या माध्यमातून एका एकर क्षेत्रात त्यांनी आंब्याची ५० रोपे लावली.
सुरुवातीच्या काळात पाण्याची मोठी समस्या होती. त्यासाठी त्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून (नरेगा) विहीर घेतली. ही विहीर त्यांच्या फळबागेसाठी जीवनदायिनी ठरली.
५० पैकी ४० झाडे आजही डौलाने उभी
कष्ट, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण देखभालीमुळे आज त्यांच्या बागेत ४० आंब्याची झाडे जोमाने उभी आहेत.
या झाडांमध्ये हापूस, केशर, रत्ना, दशेरी आणि लोणच्याचा आंबा अशा विविध जातींचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, जोगदंड हे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने आंब्याचे उत्पादन घेतात. कोणत्याही रासायनिक फवारणीशिवाय ते झाडांची निगा राखतात. त्यामुळे त्यांच्या आंब्याला बाजारात चांगली मागणी असून इतर आंब्यांपेक्षा अधिक दर मिळतो.
थेट विक्रीमुळे वाढले उत्पन्न
लक्ष्मण जोगदंड हे आपल्या बागेतील आंबे थेट बाजारात जाऊन विकतात. मध्यस्थ टाळल्यामुळे त्यांना अधिक नफा मिळतो. सेंद्रिय उत्पादन असल्याने ग्राहकही त्यांच्या आंब्याला प्राधान्य देतात.
ते सांगतात की, आंबा पिकाला फार मोठ्या मशागतीची किंवा महागड्या फवारणीची गरज नसते. वेळेवर पाणी दिले आणि झाडांची काळजी घेतली तर उत्पादन चांगले मिळते.
सुरुवातीची पाच वर्षे कठीण; आता लाखोंचे उत्पन्न
फळबाग लागवडीनंतर सुरुवातीची पाच वर्षे कोणतेही उत्पन्न मिळाले नाही. मात्र त्यांनी संयम ठेवून झाडांची काळजी घेतली.
झाडे मोठी झाल्यानंतर उत्पादन सुरू झाले आणि आता दरवर्षी १ ते १.५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
गेल्या पाच वर्षांत त्यांनी सुमारे ५ लाख रुपयांपेक्षा अधिक कमाई केली असून यावर्षी आंब्याची सेटिंग चांगली असल्याने उत्पन्नात आणखी वाढ होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी यशोगाथा
दुष्काळी भागातही योग्य नियोजन, सरकारी योजनांचा प्रभावी वापर आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधता येते, हे लक्ष्मण जोगदंड यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांची ही यशोगाथा परिसरातील अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सुरुवातीची पाच वर्षे काहीच उत्पन्न मिळाले नाही. पण झाडे मोठी झाल्यानंतर आता दरवर्षी १ ते दीड लाख रुपयांची विक्री होते. सरकारी योजनांचा योग्य वापर केला तर शेतीत नक्कीच प्रगती करता येते.- लक्ष्मण जोगदंड, शेतकरी
अधिक वाचा :Farmer Success Story : माळरानातून लाखोंची कमाई;'ही' शेतीची स्मार्ट आयडिया वाचा सविस्तर
