साहिल पटेल
संधी शहरातच मिळतात असा समज मोडीत काढत, गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव येथील माउली सगळे या तरुण शेतकऱ्याने आपल्या मेहनतीने आणि नावीन्यपूर्ण विचारांनी शेतीतूनच उद्योजकतेचा नवा मार्ग दाखवला आहे. (Mushroom Farming Success Story)
पारंपरिक शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसतानाही त्यांनी हार न मानता मशरूम शेती हा पर्याय निवडला आणि आज महिन्याला २५ ते ३० हजार रुपये स्थिर उत्पन्न मिळवत गावातच 'यशस्वी उद्योजक' ठरले आहेत.(Mushroom Farming Success Story)
शिक्षणानंतर पुण्याहून गावाकडे परतीचा प्रवास
माउली सगळे हे शिक्षणासाठी काही काळ पुण्यात राहिले. परंतु शहरातील धकाधकीच्या जीवनशैलीत त्यांना समाधान मिळालं नाही. शेतीची आवड आणि मातीत काहीतरी वेगळं करण्याची इच्छा यामुळे त्यांनी गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला.
वडिलोपार्जित दहा एकर शेती असली तरी पारंपरिक पिकांतून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यांनी आपल्या मेहुणे नागेश मस्के आणि साडू यांच्या चर्चेतून मशरूम शेतीची कल्पना आली आणि ती प्रत्यक्षात आणण्याचं ठरवलं.
छोट्या जागेत मोठं यश!
कृषी विज्ञान केंद्रातून रीतसर मशरूम शेतीचं प्रशिक्षण घेतल्यानंतर माउलींनी ३०x६० फुटांच्या शेडमध्ये ‘मशरूम फार्म’ सुरू केले.
मशरूम शेतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे
* कमी जागेत अधिक उत्पादन
* पाण्याचा कमी वापर
* बाजारात जास्त मागणी
आज त्यांच्या फार्मवर दररोज सुमारे १०० किलो उच्च प्रतीचे मशरूम तयार होतात. हे मशरूम ते ३०० ते ४०० रुपये प्रति किलो दराने विकतात.
ग्राहकांमध्ये आरोग्यवर्धक खाद्यपदार्थ म्हणून मशरूमची मागणी वाढल्याने त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळत आहे.
५ ते ६ प्रकारचे मशरूम
माउली सगळे आपल्या फार्मवर विविध प्रकारचे मशरूम तयार करतात.
ऑईस्टर मशरूम,
मिल्की मशरूम,
बटन मशरूम,
गोल्डन मशरूम आदी प्रकारांचा समावेश आहे.
यांपैकी ऑईस्टर आणि मिल्की मशरूम या दोन प्रकारांना ग्राहकांची विशेष पसंती मिळते. गेवराई तालुक्यातील या मशरूमला आता 'गेवराई ब्रँड' म्हणून ओळख मिळू लागली आहे.
राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी झाले 'ट्रेनर'
माउली सगळेंनी फक्त मशरूम उत्पादनच नव्हे, तर स्पॉन (बीज) निर्मितीची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. आज ते राज्यभरातील शेतकऱ्यांना मशरूम शेतीविषयी प्रशिक्षण देतात. त्यांच्या फार्मवर लातूर, जालना, छत्रपती संभाजी नगर, नांदेडसारख्या जिल्ह्यांमधून तरुण शेतकरी शिकण्यासाठी येतात.
माउली सगळेंचं प्रेरणादायी सूत्र काय?
शेती ही फक्त निसर्गावर अवलंबून नाही, तर नवकल्पक विचार आणि योग्य प्रशिक्षण घेतल्यास तीही एक फायदेशीर उद्योग ठरू शकते. - माउली सगळे, शेतकरी
माउली सगळेंचा संदेश
गावात राहूनही मोठं यश मिळू शकतं, फक्त प्रयत्न थांबवू नका आणि नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवा, असे माउली सगळे यांनी सांगितले.
| घटक | तपशील |
|---|---|
| व्यवसाय | मशरूम शेती |
| मासिक उत्पन्न | २५,००० – ३०,००० |
| उत्पादन | १०० किलो प्रतिदिन |
| विक्री दर | ३०० – ४०० प्रति किलो |
| प्रकार | ५ – ६ प्रकारचे मशरूम |
