जळगाव : एकीकडे राज्यातील बाजारात केळीला समाधानकारक दर (Banana Market) नसल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे काही केळी उत्पादक शेतकरी थेट विदेशात निर्यात करत आहेत. भडगाव तालुक्यातील बोदर्डे येथील शेतकऱ्याची केळी इराणला रवाना झाली. भडगाव तालुक्यातील केळी इराणच्या नागरिकांच्या पसंतीस उतरली आहे.
दोन एकर शेतात तीन हजार खोडांची लागवडबोदर्डे येथील रहिवासी तसेच प्रगतशील शेतकरी वाल्मीक शेनपडू पाटील यांनी आपल्या दोन एकर शेतीत तीन हजार केळीच्या खोडांची लागवड केली आहे. गिरणा काठी असलेल्या शेतीत मुबलक पाणी असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून ते केळी लागवड करीत आहेत. या वर्षीची केळीची पहिली कटाई ५० क्विंटलची झाली. ती त्यांनी प्रथमच इराण देशात पाठविली.
पुन्हा २८ रोजी २११ क्विंटल केळी खास १३ किलोच्या बॉक्स पॅकिंगने इराणसाठी रवाना करण्यात आली. चांगल्या प्रतीची केळी असल्यामुळेच पाटील यांची केळी इराणच्या खवय्यांना भावली आहे. तर भडगाव तालुक्यात अनेकदा काही शेतकऱ्यांची केळी ही यापूर्वी इराणमध्ये निर्यात झाली आहे.
११०० खोडांची कटाईदोन एकर क्षेत्रात वर्षभरापासून तीन हजार खोडांची लागवड केली होती. आतापर्यंत ११०० ते ११५० खोडांची कटाई झाली आहे. त्याचे साडेपाच लाख रुपये मिळाले आहेत. उर्वरित १८०० ते १८५० खोडांची कटाई होणे बाकी आहे भाव याच पद्धतीने राहिले तर चांगली रक्कम मिळेल, असे शेतकरी वाल्मीक पाटील यांनी यावेळी सांगितले.