भंडारा : शेती हा कायम तोट्याचा व्यवसाय आहे, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु, ऋतूनुसार आणि बाजारातील मागणीचा अभ्यास करून शेती केली तर शेती हा कायमच फायद्याचा व्यवसाय ठरू शकतो हे पोहरा येथील मुकेश डोलीराम मते या तरुण शेतकऱ्याने सिद्ध करून दाखविले आहे.
भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District) लाखनी तालुक्यातील मुकेश मते हा पोहरा या गावचा रहिवासी. कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन गेल्या दोन वर्षांपासून मुकेश शेतात धानपीक (Paddy Crop) निघाल्यानंतर साधारणतः नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात कलिंगडाची लागवड करतो. यासाठी शेतात पाण्याची व ठिबक सिंचनाची सुविधा केली. यावर्षी मुकेशने तीन एकर शेतीमध्ये इंडस कंपनीच्या ब्लॅक बॉस या वाणाची लागवड केली.
तालुक्यातील मौदा येथील साई हायटेक नर्सरीतून प्रति रोप दोन रुपये या दराने तीन एकरासाठी जवळपास १७ हजार रोपांची लागवड केली. जवळपास ७० ते २० दिवसात पीक तोडणीसाठी तयार होते. फेब्रुवारी महिन्यात मुकेशने शेतातील पहिला व दुसरा तोडा काढला असून, त्यातील प्रत्येक कलिंगड जवळपास ४ ते ५ किलो एवढ्या वजनाचे होते. माल नागपूर, भंडारा, लाखनी, गोंदिया व रायपूर येथील व्यापाऱ्यांनी बांधावरूनच कलिंगडाची प्रतिकिलो १२ ते १५ रुपये या दराने उचल केली.
शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
मुकेश मते यांनी शेतात ठिबक सिंचनाची सोय केली असून, त्या माध्यमातून पिकाला खत व औषधी पुरविले जाते. शेतात लागवडीच्या वेळी मल्चिंगचा वापर करीत असल्याने तण काढण्याचा खर्च वाचतो आणि पीकही जोमात येते. तीन एकरात तीन महिन्यात मुकेशने सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. यासाठी जवळपास ३ लाख रुपये खर्च आला.
आजच्या तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, बाजाराचा अभ्यास करून व्यापारी शेती केली तर त्यातून आपले जीवनमान उंचावून सन्मानाने जगता येते.
- मुकेश मते (शेतकरी, पोहरा)