- पांडुरंग कांबळे
गडचिरोली : जिद्द, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली की, ग्रामीण भागातील महिलाही यशाचे शिखर सर करू शकतात, हे चामोर्शी तालुक्याच्या घोट येथील कल्पना चंद्रशेखर वर्दलवार यांनी सिद्ध करून दाखवले आहे. 'उमेद' महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा विस्तार वाढवत आज एक यशस्वी महिला व्यवसायिका म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
कल्पना वर्दलवार यांनी जय संतोषी जिजामाता महिला ग्रामसंघाच्या माध्यमातून आपल्या उद्योगाचा पाया रचला. त्यांना अभियानाकडून प्राप्त झालेल्या विविध निधींचा त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध वापर केला. पनीर तयार करण्याचे यंत्र बसविण्याचा मानस आहे.
असे प्राप्त केले अर्थसाहाय्य
कल्पना वर्दलवार यांनी ग्रामसंघाच्या माध्यमातून सीआयएफमधून ४० हजार रुपये, सीईएफमधून १ लाख रुपये, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून १ लाख ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य प्राप्त केले. केवळ एकाच व्यवसायावर अवलंबून न राहता कल्पना यांनी दुग्ध व्यवसाय, शेळीपालन आणि कुक्कुटपालन अशा त्रिसूत्रीचा अवलंब केला.
आज त्या दररोज ४० लिटर दुधाची विक्री डेअरीला करतात. केवळ दूधच नव्हे, तर तूप, दही आणि खवा यांसारखी मूल्यवर्धित उत्पादने तयार करून त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत. कुक्कुटपालनातून त्यांना दरमहा १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
घरातील जबाबदाऱ्या सांभाळूनही आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकतो, हे 'उमेद'मुळे शक्य झाले. ग्रामीण महिलांनी संधीचे सोने केल्यास त्या कुटुंबाचा आणि समाजाचा चेहरा बदलू शकतात.
- कल्पना वर्दलवार, व्यवसायिका, घोट
