सुभाष सुरवसे
बदलते हवामान, पाण्याची टंचाई आणि पारंपरिक पिकांतील अनिश्चित उत्पन्न या तिहेरी आव्हानांवर मात करत तिवठाणा येथील प्रगतिशील शेतकरी जयराम बाबुराव धोंडगे यांनी शेतीत नवकल्पना राबवत यशाचा नवा मार्ग निर्माण केला आहे.(Farmer Success Story)
हळद आणि मिरची या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून त्यांनी कमी क्षेत्रात अधिक उत्पादन मिळवत आर्थिक प्रगती साधली आहे.(Farmer Success Story)
पारंपरिक शेतीतून नवकल्पनेकडे
धोंडगे यांच्याकडे सर्वे क्रमांक १९ मध्ये सुमारे १.९३ हेक्टर शेती आहे. पूर्वी ते कापूस, तूर आणि सोयाबीन ही पारंपरिक पिके घेत होते.
मात्र, या पिकांमधील अनिश्चित उत्पन्नामुळे त्यांनी तीन वर्षांपूर्वी एक एकर क्षेत्रावर हळद लागवडीचा प्रयोग सुरू केला. सुरुवातीला छोट्या प्रमाणावर केलेला हा प्रयोग त्यांनी सातत्याने सुधारत अधिक फायदेशीर बनवला.
लागवडीतील शास्त्रीय पद्धती
हळद लागवडीसाठी 'सेलम' जातीचे सुमारे ८ क्विंटल बियाणे प्रति एकर वापरण्यात आले. लागवडीपूर्वी बियाण्यावर बुरशीनाशक प्रक्रिया करून रोगांचा धोका कमी करण्यात आला. बेड पद्धतीने लागवड केल्यामुळे पाण्याचा निचरा सुधारला आणि कंदांची वाढ जोमदार झाली.
आंतरपीकातून दुहेरी फायदा
हळदीच्या दोन ओळींमध्ये मिरचीचे आंतरपीक घेण्याचा प्रयोग धोंडगे यांनी यशस्वीपणे राबवला. यामुळे जमिनीचा पूर्ण क्षमतेने वापर झाला, तण नियंत्रणात राहिले आणि अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला. एकाच पिकावर अवलंबित्व कमी झाल्याने जोखीमही लक्षणीयरीत्या घटली.
ठिबक सिंचनामुळे बचत
ठिबक सिंचनाचा वापर केल्यामुळे पाण्याची ३० ते ४० टक्के बचत झाली. तसेच खतांचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादनात वाढ झाली.
संतुलित खत व्यवस्थापन करत डीएपी, सुपर फॉस्फेट, १९:१९, १२:६१:०, १३:४०:१३, ०:०:५० आणि पोटॅशियम यांचा ठिबकद्वारे पुरवठा करण्यात आला.
खर्च आणि उत्पन्नाचे गणित
या संपूर्ण लागवडीसाठी सुमारे ५२,४०० रुपये खर्च आला. हळदीपासून २५ ते ३० क्विंटल उत्पादन अपेक्षित असून, मिरची आंतरपिकातून सुमारे ५० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे. बाजारभाव अनुकूल राहिल्यास एकूण नफ्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
शासकीय मदतीचा आधार
कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे आणि ठिबक सिंचन तसेच शेती अवजारांवरील शासकीय अनुदानामुळे उत्पादन खर्च कमी करण्यात मदत झाली.
आधुनिक तंत्रज्ञान आणि शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केल्याने शेती अधिक नफ्याची ठरू शकते, हे धोंडगे यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
जोखीम कमी करणारी शेती
हळद-मिरची आंतरपीक पद्धती ही कमी क्षेत्रात अधिक उत्पादन देणारी, पाणी व खर्च वाचवणारी आणि जोखीम कमी करणारी आहे.- जयराम धोंडगे, शेतकरी
धोंडगे यांची ही यशोगाथा बदलत्या परिस्थितीत शेतीत नवकल्पना आणि योग्य नियोजन केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण आहे.
कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब हा आजच्या काळाची गरज बनली आहे.
