- गोपाल लाजूरकर
गडचिरोली : दिवसेंदिवस शेती ही तोट्यात असल्याचे शेतकऱ्यांकडूनच बोलले जाते. पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने लागवड खर्च भरून निघत नाही. त्यामुळे शेती कसणे कठीण होत आहे, असा सूर शेतकऱ्यांमध्येच असताना गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील मूलचेरा तालुक्याच्या अतिदुर्गम चिचेला येथील आदिवासी शेतकरी सुबेनराव गंगाराम येरमे हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रयोगशील शेती (Mixed Farming) कसत आहेत.
खुदिरामपल्लीजवळ असलेल्या चिचेला येथील सुबेनराव गंगाराम येरमे यांच्याकडे १.५६ हेक्टर आर. शेती आहे. या शेतीत ते प्रामुख्याने खरीप हंगामात धान तसेच रब्बी हंगामात मका, हरभरा व भाजीपाला ही पिके घेतात. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याकरिता तुषार सिंचन, ठिंबक (Drip Irrigation) सिंचनाचा वापर ते आपल्या शेतात करतात, याशिवाय संरक्षित सिंचनाकरिता शेततळे खोदलेले आहे. त्यांची ही मिश्र शेती इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
शेततळ्यात पाणी संरक्षित करून ते पिकाला आवश्यकतेनुसार देत असतात. तालुका कृषी अधिकारी सोनाली सुतार व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आकाश लवटे यांच्या मार्गदर्शनात शेतकरी येरमे हे कृषी विभागाने आयोजित केलेले शेतकरी मेळावे व शेतीशाळांमध्ये सहभागी होतात. येरमे हे शेतामध्ये यांत्रिकीकरणाचा प्रभावी वापर करतात. त्यांच्याकडे ट्रॅक्टर, रोटावेटर, रिपर, मळणी यंत्र व कोनोविडर ही यंत्रे आहेत.
गादीवाफ्यावर रोपांची लागवड
शेतकरी येरमे हे भाजीपाला रोपट्यांची लागवड गादीवाफ्यावर करतात. त्यानंतर रोपट्यांची लागवडीसाठी प्लास्टिक मल्चिंगचा वापर करतात. शेतातून आलेले उत्पादन थेट ग्राहकांना विक्री करतात. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री करतात.
सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर
शेतकरी येरमे यांच्याकडील एकूण शेतीपैकी त्यांनी ०.४० हेक्टर आर. जागेवर त्यांनी आंब्याची लागवड केलेली आहे. त्यांच्याकडे असलेली फळबाग इतरही शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.कीड रोग नियंत्रणासाठी जैविक/नैसर्गिक पद्धतीचा वापर येरमे हे करतात. जैविक कीटकनाशकांमध्ये दशपर्णी अर्क, निबोळी अर्क यांचा वापर ते करतात. त्यामुळे विषमुक्त पीक उत्पादनासाठी मदत मिळते.
पीक स्पर्धेत पटकाविला प्रथम क्रमांक
शेतकरी येरमे यांनी आपल्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व पीक लागवड पद्धतीचा वापर कसा केला, याबाबत माहिती व प्रशिक्षण देतात. त्यांनी मागील वर्षी जिल्हा स्तरीय पीक स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला होता. उच्च प्रतीची बियाणे वापरून दरवर्षीच ते पीक स्पर्धेत सहभागी होतात.