बी. व्ही. चव्हाण
'केल्याने होत आहे रे… आधी केलेची पाहिजे!' या उक्तीचा खरा अर्थ उमरी तालुक्यातील धानोरावाडी येथील तरुण शेतकरी दत्ताहरी लक्ष्मणराव सावळे (वय २७) यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवला आहे. (Farmer Success Story)
अवघ्या एक एकर शेतीमध्ये सहा महिन्यांत ९ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवत त्यांनी आधुनिक शेतीपुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.(Farmer Success Story)
नकारात्मकतेला कष्टाने दिले उत्तर
आजही अनेक शेतकरी 'शेती परवडत नाही, मजूर मिळत नाहीत, नापिकी होते' अशा तक्रारी करत नैराश्यात जात आहेत.
मात्र, दत्ताहरी सावळे यांनी या सर्व नकारात्मक विचारांना आपल्या मेहनतीने आणि नियोजनाने उत्तर दिले. शेतीकडे केवळ परंपरा म्हणून न पाहता व्यवसायिक दृष्टिकोनातून पाहिल्यास मातीतूनही सोनं उगवता येतं, हे त्यांनी दाखवून दिले.
कमी जमीन, मोठे स्वप्न
दत्ताहरी यांच्याकडे एकूण एक हेक्टर जमीन होती. त्यापैकी १३ गुंठे जमीन उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या कालव्यासाठी गेली.
उर्वरित जमिनीत काहीतरी वेगळे आणि मोठे करण्याची त्यांची जिद्द होती. जमीन फारशी सुपीक नसतानाही त्यांनी हार मानली नाही.
कुटुंबाची साथ, कष्टांची जोड
वडील लक्ष्मणराव आबाजी सावळे यांचे मार्गदर्शन आणि २२ वर्षीय भाऊ सुदाम सावळे यांची साथ घेत दत्ताहरींनी दिवस-रात्र शेतात घाम गाळला. कुटुंबातील एकजूट, विश्वास आणि प्रामाणिक मेहनत हीच त्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली ठरली.
वांग्याची यशस्वी लागवड
दत्ताहरी यांनी भाजीपाला वर्गातील वांगी या पिकाची निवड केली.
योग्य अंतरावर लागवड
खतांचे संतुलित व्यवस्थापन
ठिबक सिंचनाद्वारे पाणी नियोजन
कीड व रोग नियंत्रणासाठी वेळेवर फवारणी
या काटेकोर नियोजनामुळे पिकाने त्यांना भरघोस प्रतिसाद दिला. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी विक्रीचे नियोजनही योग्य पद्धतीने केले.
शेतीतून शिक्षणाची शिदोरी
दत्ताहरी सावळे केवळ स्वतः चे घर चालवत नाहीत, तर त्यांचे दोन भाऊ शहरात शिक्षण घेत असून त्यांचा संपूर्ण खर्च या शेतीच्या उत्पन्नातूनच भागवला जातो.
शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून भविष्यासाठीची गुंतवणूक ठरू शकते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी संदेश
बांधावर उभं राहून शेती करणाऱ्यांना हे गणित जमणार नाही. मातीत उतरावं लागतं. योग्य नियोजन आणि मेहनतीमुळेच आज मला हे यश मिळालं.- दत्ताहरी सावळे, प्रयोगशील शेतकरी
तरुणांसाठी जिवंत उदाहरण
धानोरावाडीतील ही यशोगाथा आज परिसरातील अनेक तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक नियोजनाची जोड दिल्यास, कमी क्षेत्रातूनही लाखोंचे उत्पन्न मिळू शकते, याचा हा जिवंत पुरावा आहे.
