गोविंद टेकाळे
शेतीमध्ये कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. मात्र जिद्द, योग्य नियोजन आणि पीक बदलाचा धाडसी निर्णय घेतल्यास नुकसान भरून निघू शकते, हे अर्धापूर तालुक्यातील लहान येथील प्रयोगशील शेतकरी अनिल सदाशिव हरकरी यांनी सिद्ध करून दाखवले आहे.(Farmer Success Story)
पपईला रोगांचा फटका, मोठं नुकसान
हरकरी यांनी मोठ्या अपेक्षेने पपईची लागवड केली होती. परंतु अनियमित हवामान, अतिवृष्टीचा परिणाम आणि विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळाले नाही.
खर्च झालेला, पण उत्पन्न हाती न लागल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले. अनेक शेतकरी अशा वेळी हताश होतात; मात्र हरकरी यांनी खचून न जाता पर्यायाचा विचार केला.
५० गुंठ्यात कदूची लागवड; तीन महिन्यांत तोडणी
पपईचा प्लॉट अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी ५० गुंठे क्षेत्रावर कदू (भोपळा) लागवडीचा निर्णय घेतला. ऑगस्ट महिन्यात लागवड करून योग्य खत व्यवस्थापन, वेळेवर पाणी आणि कीडनियंत्रण याकडे विशेष लक्ष दिले.
नोव्हेंबरपासून काढणीला सुरुवात झाली. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांत सातत्याने उत्पादन मिळाले. स्थानिक बाजारपेठेत चांगला दर मिळाल्याने उत्पन्नात वाढ झाली.
सव्वा दोन लाखांचे उत्पन्न
केवळ ५० गुंठे क्षेत्रातून हरकरी यांनी सुमारे २ लाख २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. पपईमधील नुकसान त्यांनी कदूच्या यशस्वी लागवडीतून भरून काढले. कमी कालावधीत, कमी जोखमीच्या पिकातून त्यांनी नफा मिळवला.
एकाच पिकावर अवलंबून राहू नका
शेतकऱ्यांनी एका पिकावर अवलंबून न राहता हवामान आणि बाजारपेठेचा अंदाज घेऊन पीक बदल करणे गरजेचे आहे. संकटात खचून न जाता पर्याय शोधला तर यश नक्की मिळते.- अनिल हरकारी, शेतकरी
इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा
हरकरी यांचा प्रयोग हा परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. हवामानातील बदल आणि बाजारातील चढ-उतार लक्षात घेऊन पीक विविधीकरण केल्यास उत्पन्न टिकवता येते, हे त्यांच्या उदाहरणातून स्पष्ट झाले आहे.
अर्धापूर तालुक्यातील या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे की, योग्य निर्णय आणि मेहनत असेल तर संकटही संधीमध्ये बदलता येते.
