गणेश लोंढे
आज शेती परवडत नाही, अशी सर्वसाधारण तक्रार ऐकू येत असतानाच जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील निपानी पिंपळगाव येथील तरुण शेतकरी पांडुरंग अच्युतराव ढेंबरे यांनी आपल्या कष्ट, योग्य नियोजन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीही फायदेशीर ठरू शकते, हे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.(Farmer Success Story)
अवघ्या ३ एकर क्षेत्रात तब्बल ४५ क्विंटल ८१ किलो तुरीचे विक्रमी उत्पादन घेऊन त्यांनी संपूर्ण परिसराचे लक्ष वेधले असून, इतर शेतकऱ्यांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.(Farmer Success Story)
नियोजनबद्ध लागवडीचा प्रयोग
पांडुरंग ढेंबरे यांनी तुरीच्या लागवडीसाठी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक व शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब केला.
टोकन यंत्राद्वारे पेरणी
दोन ओळींतील अंतर ४ फूट, तर मध्ये ८ फूट मोकळी जागा
पिकाला भरपूर सूर्यप्रकाश व हवा मिळेल, याची काटेकोर काळजी
या विशिष्ट लागवड पद्धतीमुळे तुरीच्या वाढीस पोषक वातावरण तयार झाले आणि त्याचा थेट सकारात्मक परिणाम उत्पादनावर दिसून आला.
'गोदावरी' वाणाची कमाल
लागवडीसाठी त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या 'गोदावरी' या सुधारित तूर वाणाची निवड केली.
या वाणाची वैशिष्ट्ये :
जास्त रोगप्रतिकारशक्ती
अधिक शेंगा भरण्याची क्षमता
उत्पादन स्थिर व दर्जेदार
योग्य वाणाची निवड हे यशाचे एक महत्त्वाचे गमक ठरले.
आधुनिक व्यवस्थापनातून विक्रमी उत्पादन
तुरीच्या पिकासाठी ढेंबरे यांनी संपूर्ण हंगामात सूक्ष्म नियोजन केले.
ठिंबक सिंचनाद्वारे गरजेनुसार पाणीपुरवठा
कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य वेळी खत व्यवस्थापन
रोग व कीड नियंत्रणासाठी वेळेवर दोन फवारण्या
आठ दिवसांपूर्वी कापणी करून दोन दिवसांपूर्वी मळणी केली असता, तब्बल ६३ कट्टे तूर भरली गेली.
मोजमापात एकूण उत्पादन ४५ क्विंटल ८१ किलो निघाले. म्हणजेच प्रति एकर १५ क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन, जे परिसरात क्वचितच पाहायला मिळते.
इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा
आज अनेक शेतकरी खर्च, बाजारभाव आणि नैसर्गिक संकटांमुळे निराश असताना, पांडुरंग ढेंबरे यांची ही यशकथा सांगते की,
योग्य वाण, आधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञांचा सल्ला आणि काटेकोर व्यवस्थापन असेल, तर शेती नक्कीच फायदेशीर ठरू शकते.
त्यांचा हा प्रयोग आज परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून, अनेक शेतकरी त्यांच्या पद्धती जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष शेतावर भेट देत आहेत.
हे ही वाचा सविस्तर : जंगलात वेचलेलं 'मोहाळ' ठरतंय आदिवासींचं सुवर्णभांडार वाचा सविस्तर
