Farmer Success Story : हिंगोली जिल्ह्यातील साटंबा गावातील सुशील टापरे यांनी नोकरीच्या मागे न लागता दोन एकर शेतीतून मिरची आणि कोथिंबिरीच्या लागवडीद्वारे साडेतीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न घेतले.(Farmer Success Story)
तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरलेली ही कथा दाखवते की, नियोजनबद्ध शेतीतूनही यश आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला आहे.(Farmer Success Story)
पारंपरिक शेतीपासून आधुनिकतेकडे प्रवास
हिंगोली तालुक्यातील साटंबा गावातील सुशील टापरे हे नाव आज अनेक तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुतेक तरुण नोकरीच्या मागे धावतात.
मात्र, सुशील यांनी वेगळा विचार केला 'नोकरी मागण्यापेक्षा शेतीतच संधी शोधूया!' या विचाराने त्यांनी घरच्या दोन एकर जमिनीत आधुनिक व नियोजनबद्ध शेती करण्याचा निर्णय घेतला.
मिरचीपासून सुरुवात, कोथिंबिरीने बदलली दिशा
सुरुवातीला सुशील यांनी मिरची लागवड केली. मिरचीचे उत्पादन चांगले मिळाले, पण ऑगस्ट-सप्टेंबरमधील अवकाळी पावसामुळे झाडे खराब झाली. तथापि, त्यांनी हार न मानता तात्काळ कोथिंबिरीची लागवड केली. दसरा-दिवाळीच्या सणासुदीच्या काळात कोथिंबिरीला मोठी मागणी असल्याने त्यांना भाव चांगला मिळाला.
या वेळच्या हंगामात त्यांनी केवळ २ एकरांमधून साडेतीन ते चार लाख रुपयांचे एकूण उत्पन्न मिळवलं. म्हणजेच, पारंपरिक पिकांना बगल देऊन भाजीपाल्याच्या शेतीतही चांगलं उत्पन्न मिळू शकतं, हे त्यांनी दाखवून दिले.
नियोजन, कष्ट आणि कौटुंबिक साथ हेच यशाचे गमक
सुशील यांच्या मते, यशाचं गमक म्हणजे नियमित काम, योग्य वेळेत लागवड आणि कौटुंबिक सहकार्य. हेच यशाचे गमक आहे. त्यांच्या शेतात आई-वडील आणि कुटुंबातील सर्व सदस्य सकाळी पाच वाजल्यापासून भाजीपाला तोडायला सुरुवात करतात.
त्यानंतर भाजीपाला दुचाकीवर घेऊन बाजारात विक्रीसाठी जातात.कुटुंबाने हातभार लावल्यामुळे रोजंदारीचा खर्च वाचला आणि वेळेवर कामही पूर्ण होतं.
दोन एकरांतून चार लाखांचा प्रवास
केवळ चार ते पाच महिन्यांत सुशील यांनी साडेतीन ते चार लाख रुपये उत्पन्न मिळवलं. त्यासाठी त्यांनी अंदाजे साडेतीन ते चार लाखांचा खर्च केला, पण बाजारातील चांगल्या भावामुळे नफा निश्चित झाला. त्यांना हिंगोली, वाशिम, कनेरगाव बाजारपेठांमध्ये कोथिंबिरीला चांगला दर मिळाला.
अपयशातून घेतला धडा
सुशील सांगतात, “सुरुवातीला दोन वर्षे अपयश आलं, पण त्यातून अनुभव मिळाला. भाजीपाल्याची लागवड कधी करायची, कोणत्या हंगामात कोणती पिकं द्यायची आणि बाजारात विक्रीची योग्य वेळ कोणती हे समजल्यावर यश हाती आलं.
तरुणांसाठी प्रेरणा
आज सुशील टापरे हे “नोकरी नको, शेतीतच भविष्य” या विचाराचे प्रतीक बनले आहेत. त्यांनी दाखवून दिलं की, जर मनापासून प्रयत्न केले, नवीन तंत्रज्ञान आणि योग्य बाजार नियोजनाचा वापर केला, तर लहानशा जमिनीतूनही लाखोंचं उत्पन्न मिळवणं शक्य आहे.
सुशील टापरे यांची ही कथा केवळ शेतीतील यश नव्हे, तर दृष्टीकोन बदलण्याची गोष्ट आहे. त्यांनी दाखवून दिले की नोकरीपेक्षा आत्मनिर्भरतेचा मार्ग शेतीतूनच सापडू शकतो. आज त्यांच्या प्रयोगशील दृष्टिकोनामुळे अनेक तरुण शेतकरी प्रेरित होत आहेत आणि आधुनिक शेतीकडे वळत आहेत.