Farmer Success Story : कुक्कुटपालन व्यवसायाच्या जोरावर कोट्यवधींची उलाढाल गाठणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी रवींद्र माणिकराव मेटकर (Ravindra Manikrao Metkar) यांना आता थेट ऑक्सफर्ड विद्यापीठ (University of Oxford) येथे आपले अनुभव मांडण्याची संधी मिळाली आहे.(Farmer Success Story)
१ ते ५ मे दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते कृषी उद्योजक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.(Farmer Success Story)
ही परिषद ग्लोबल इकॉनॉमिक फोरम (GEF) आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असून, एआय फॉर एव्हरी माइंड (AI for Every Mind) या संकल्पनेवर मेटकर आपले विचार मांडणार आहेत.(Farmer Success Story)
१०० कोंबड्यांपासून १.८ लाखांपर्यंतचा प्रवास
म्हसाळा (अंजनगाव बारी) येथील मेटकर यांनी १९८४ साली केवळ ३ हजार रुपयांत आणि १०० कोंबड्यांपासून कुक्कुटपालन व्यवसायाची सुरुवात केली. त्या वेळी त्यांचे वडील वन विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत साधी होती.
एम.कॉम. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कुटुंबाची जमीन विकून बडनेरा येथे नवीन जमीन घेतली आणि ५ लाखांचे कर्ज घेऊन ४ हजार कोंबड्यांचा प्रकल्प सुरू केला. २००६ पर्यंत हा व्यवसाय १० एकरावर २० हजार कोंबड्यांपर्यंत विस्तारला.
संकटांवर मात करत उभी केली नवी वाट
बर्ड फ्लूच्या साथीमुळे २००६ मध्ये त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. मात्र, हार न मानता त्यांनी २००८ मध्ये २५ लाखांचे कर्ज घेऊन पुन्हा नव्याने सुरुवात केली. सातत्य, मेहनत आणि नियोजनाच्या जोरावर त्यांनी व्यवसायात पुन्हा उभारी घेतली.
आज त्यांच्या ५० एकर परिसरात १ लाख ८० हजार कोंबड्या असून, वार्षिक उलाढाल सुमारे १५ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे सध्या त्यांच्या नावावर कोणतेही बँक कर्ज नाही.
बहुविध शेतीतूनही यश
कुक्कुटपालनासोबतच ते केळी, आंबा, संत्रा, मोसंबी, चिकू, नारळ, गहू आणि मका यांची शेती करतात. सेंद्रिय खतांचा वापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवण्याचा त्यांनी यशस्वी प्रयोग केला आहे.
जागतिक स्तरावर मार्गदर्शन
मेटकर यांनी केवळ स्वतःचा व्यवसाय वाढवला नाही, तर देश-विदेशातील विविध कृषी संस्थांमध्ये व्याख्याने देत इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन केले आहे.
आता ऑक्सफर्डसारख्या जागतिक दर्जाच्या व्यासपीठावर त्यांना बोलावण्यात आल्याने त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे.
हा प्रत्येक कष्टकरी शेतकऱ्याचा सन्मान
एकेकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी माझ्याकडे सायकल नव्हती, फाटके कपडे शिवून वापरायचो. आज चक्क ऑक्सफर्ड विद्यापीठात निमंत्रण मिळालं, यावर माझा विश्वास बसत नाहीये. हा कष्ट करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा सन्मान आहे. - रवींद्र मेटकर, शेतकरी उद्योजक
शून्यातून सुरुवात करून जागतिक स्तरावर पोहोचण्याचा मेटकर यांचा प्रवास हा कृषी क्षेत्रातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कष्ट, नवकल्पना आणि चिकाटीच्या जोरावर शेतीतही मोठं यश मिळू शकतं, हे त्यांनी दाखवून दिलं आहे.
