ज्ञानेश्वर गायकवाड
अतिवृष्टीमुळे शेती संकटात सापडली असतानाही खचून न जाता योग्य नियोजन आणि आधुनिक शेती पद्धतींच्या जोरावर भरघोस उत्पन्न मिळविण्याची किमया सेलू तालुक्यातील हिस्सी येथील शेतकरी भास्कर भगवानराव गात यांनी साधली आहे. (Farmer Success Story)
अवघ्या ४० गुंठ्यांमध्ये हिरव्या मिरचीचे तब्बल ३०० क्विंटल उत्पादन घेत त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात तिखट मिरचीनेही गोडवा आणता येतो, हे दाखवून दिले आहे.(Farmer Success Story)
भास्कर गात यांनी जून महिन्यात ४० गुंठ्यांमध्ये सुमारे ३ हजार मिरची रोपांची लागवड केली. पिकाच्या संपूर्ण कालावधीत योग्य खत व्यवस्थापन, कीटकनाशकांचा संतुलित वापर, वेळोवेळी अंतर्गत मशागत आणि पाण्याचे काटेकोर नियोजन केल्यामुळे मिरची पीक चांगले बहरले. यासाठी त्यांना सुमारे ३ लाख रुपयांचा खर्च आला.(Farmer Success Story)
३०० क्विंटल उत्पादन, १२ लाखांची विक्री
मिरचीच्या पिकाची तोडणी अद्याप सुरू असली तरी आतापर्यंत सुमारे ३०० क्विंटल हिरव्या मिरचीचे उत्पादन मिळाले आहे.
बाजारात सरासरी ४० रुपये किलो दर मिळाल्याने आतापर्यंत १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. खर्च वजा जाता सुमारे ८ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे भास्कर गात यांनी सांगितले.
महिलांना रोजगाराची संधी
मिरची तोडणीसाठी स्थानिक ग्रामीण महिलांना रोजगार मिळाला असून, त्यामुळे शेतीसोबतच गावातील रोजगारनिर्मितीलाही चालना मिळाली आहे.
सध्या मिरचीची तोडणी अंतिम टप्प्यात असून, उर्वरित उत्पादनातून उत्पन्नात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
पारंपरिक शेतीला फाटा, नियोजनावर भर
पारंपरिक पिकांपेक्षा बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मिरची पीक घेण्याचा निर्णय घेतल्याचे भास्कर गात यांनी सांगितले. कोणत्या मालाला बाजारात मागणी आहे, कुठे तुटवडा आहे आणि भावाचा अंदाज घेऊन पीक नियोजन केल्यास अल्प क्षेत्रातही मोठे उत्पन्न मिळू शकते, असा अनुभव त्यांनी मांडला.
शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण
अतिवृष्टीसारख्या संकटातून सावरत आधुनिक तंत्रज्ञान, योग्य व्यवस्थापन आणि बाजाराभिमुख शेती केल्यास शेती फायदेशीर ठरू शकते, हे भास्कर गात यांच्या यशकथेतून स्पष्ट होते. कमी क्षेत्रात जास्त उत्पादन आणि चांगला दर मिळविण्यासाठी ही यशोगाथा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
