- गणेश पंडित/राहुल वरशीळ
जालना : भोकरदन तालुक्यातील इंगळेवाडी येथील शेतकरी विलास हरिभाऊ इंगळे यांनी शेतीत प्रयोगशिलता दाखवत कोरडवाहू जमिनीत 'ड्रॅगन फ्रूट'ची परदेशी दर्जाची बाग उभारून इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी मोबाइल रिपेअरिंगचे काम सांभाळत आधुनिक शेतीकडे वाटचाल करून आज लाखोंचा नफा मिळवून नव्या पिढीसमोर आदर्शवत उदाहरण ठेवले आहे.
२०२३ मध्ये विलास इंगळे यांनी एका एकरात तब्बल ४०० पोल टाकून त्यावर प्रत्येकी चार ड्रॅगन फ्रुटची रोपे लावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आधुनिक 'सिमेंट पोल' पद्धतीबरोबरच ठिबक सिंचनाचाही वापर केला. त्यांनी या तंत्रज्ञानाद्वारे ५०-६० टक्के पाण्याची बचत साधली. शिवाय, गांडूळखत व सेंद्रिय खतांच्या नियोजनबद्ध वापरामुळे रोपांची वाढ, फूलधारणा आणि फळांची गुणवत्ता अधिक उत्तम झाली.
मोबाइल दुरुस्ती ते यशस्वी शेतकरी
मोबाइल रिपेअरिंगचे काम सांभाळत २०२३ मध्ये त्यांनी एका एकरावर ४०० ड्रॅगन फुटची रोपे लावण्याचा निर्णय घेतला. यंदा या शेतीतून निव्वळ नफा पाच लाखांपेक्षा अधिक झाल्यामुळे त्यांनी शेतीकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
पहिल्या वर्षी साडेचार लाख खर्च
ड्रॅगन फ्रुटला लागवडीनंतर सुमारे १५ महिन्यांनंतर फळधारणा सुरू होते. त्यांनी दुसऱ्याच वर्षी प्रतिएकर १० ते १२ टन उत्पादन घेऊन लाखोंचा नफा मिळविला आहे. सध्या बाजारात ड्रॅगन फ्रुटला १०० ते ११० रुपये प्रतिकिलो भाव मिळत असल्याने एका एकरातूनही लाखोंची वार्षिक उलाढाल सहज शक्य होत आहे.
- एकूण खर्च, झालेला नफा
- सुरुवातीचा खर्च : ४ ते ४.५ लाख
- वार्षिक देखभाल खर्च: ५० हजार रुपये
- वार्षिक उत्पन्न खर्च ८ ते १२ लाख
- निव्वळ नफा खर्च: ५ ते १० लाख
एका पोलला चार कलमे असून एका कलमापासून ३० ते ५० फळे निर्माण होतात. पहिल्या वर्षी चार ते साडेचार लाख रुपये गुंतवणूक झाली; दुसऱ्या वर्षी ५० हजार रुपये खर्च आला. सध्या सिल्लोडमधील व्यापारी थेट शेतातूनच माल उचलून नेत आहेत.
कुटुंबाचा हातभार महत्त्वाचा
इंगळे कुटुंबाकडे एकूण नऊ एकर जमीन असून, स्वतः सह आई-वडील आणि पत्नी मिळून शेतीची जबाबदारी सांभाळतात. जून ते ऑक्टोबरदरम्यान सात वेळा फळकाढणी होते, ही या पिकाची खासियत. परदेशात लोकप्रिय असलेले हे पीक आता मराठवाड्यातही शेतकऱ्यांसाठी नवा पर्याय ठरत आहे. या पिकाला २० वर्षे वय असल्यामुळे कमी खर्च येतो. अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही कमी खर्चातदेखील ही शेती करता येते.
- विलास इंगळे, शेतकरी, इंगळेवाडी, भोकरदन
