Join us

Success Story : खडकाळ जमिनीवर फुलवली फणसाची बाग, चंद्रपूरच्या शेतकऱ्याचा प्रयोग 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 6:41 PM

आज लाखो रुपयांचे फणस चंद्रपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी नेण्यात येत आहेत.

- राजू गेडाम

चंद्रपूर : पोषक वातावरण नाही, असा कांगावा करीत अनेक शेतकरी धानाव्यतिरिक्त इतर उत्पादन घेण्यास पुढाकार घेत नाही. मात्र, कृषी क्षेत्रात विकसित झालेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खडकाळ जमिनीत दीड वर्षापूर्वी ४०० फणसांची झाडे लावून केवळ शेणखताचा वापर करून उत्तमरीत्या जगविले. आज लाखो रुपयांचे फणस चंद्रपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी नेण्यात येत आहेत. यावरून योग्य नियोजन केले तर उत्पादन नक्कीच मिळते, हे सुमित समर्थ या युवा शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.

नैसर्गिक वातावरणातील बदलामुळे सर्वच ऋतूंत बदल झाल्यामुळे दरवर्षी पाऊस समाधानकारक येईलच सांगता येत नाही. यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करून पाण्याचा एक थेंबदेखील वाया जाणार नाही, याची काळजी घेतली तर उत्पादन नक्कीच मिळते. यासाठी प्रयत्नाचा ध्यास व नवीन काहीतरी करण्याची धडपड असणे आवश्यक आहे. असलाच काहीसा प्रकार सुमित समर्थ या युवा शेतकऱ्याने करून दाखविला. एक एकरात त्यांनी ४०० फणसांची झाडे प्रायोगिक तत्त्वावर लावली. 

सेंद्रिय शेती ही काळाची गरज असल्याने कोणत्याही प्रकारचा युरिया अथवा सल्फेट या सारख्या रासायनिक खतांचा वापर न करता फक्त शेणखत व गांडूळ खत-वर्मी कंपोस्टचा वापर केला. शेकडो क्विंटल झालेले फणसाचे उत्पादन विक्रीसाठी चंद्रपूरच्या कृषी उत्पन्न बाजारात विक्रीसाठी नेले जात असून, लाखो रुपये त्यापासून उत्पन्न मिळायला लागले आहे.

शेतात अनेक फळझाडांची लागवड 

याचबरोबर शेतात आंबा, सीताफळ, चिकू, पेरू, लिंबू, शेवगा, करवंद, नारळ, ड्रॅगन फ्रूट, संत्रा, मोसंबी, डाळिंब, रामफळ, स्टारफ्रूट, अंजीर, लिच्ची, खजूर, वॉटर अॅपल, जांभूळ, सोनकेळ आदी झाडे १६ एकरमध्ये लावली आहेत. काहीतरी नवीन करण्याची उमेद मनात बाळगली तर यश नक्कीच मिळते, असा आशावाद सुमित समर्थ यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :शेतीमार्केट यार्डफळेचंद्रपूरशेतकरी