- राजेश मुनीश्वर
गोंदिया : धानशेतीला पूरक व्यवसाय म्हणून आता तालुक्यातील शेतकरी नगदी पिकाकडे वळत आहेत. तालुक्यातील सिंदीपार, पांढरी, मुरपार, कोसमतोंडी, सौंदड, चिचटोला, घाटबोरी, मुंडीपार आदी गावांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात मका, टरबूज, भेंडी, कारली, ऊस, केळ, पेरू आदी भाजीपाला पिके घेत आहेत, तर आता काही शेतकऱ्यांनी तब्बल १६० एकरात अॅपल बोरची लागवड केली आहे.
गोंदिया जिल्ह्यात सर्वात जास्त एप्पल बोरची लागवड ही सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार या एकाच गावात करण्यात आली आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी चंदू शंकर लंजे यांनी आपल्या शेतात २२ एकरांत अॅपल बोर लागवड केली आहे. अॅपल बोर लागवडीमुळे परिसरातील ८० ते ९० शेतमजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.
सिंदीपार येथील एप्पल बोर हे नागपूर, पंजाब, दिल्ली, रायपूर आदी मोठ्या शहरांमध्ये पाठविले जात आहे. शेतकरी चंदू लंजे यांनी आपले आई- वडील, भाऊ यांच्या सहकार्याने शेतीचा व्यवसाय थाटला आहे. चंदू लंजे यांना २२ एकरात ५५ लाख रुपये, खर्च वजा जाता शुद्ध नफा मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनीही धान पिकासोबतच नगदी पिकाकडे वळण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी मोठ्या प्रमाणात धानपिकासोबतच नगदी पिकाकडे वळल्याने स्वतःचा आर्थिक विकास साधला आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात असून, शेतकऱ्यांना दिशा दिली जात आहे.
- निशा काशीवार, उपसभापती पंचायत समिती, सडक अर्जुनी.
कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून विविध पिकाची तंत्रशुद्ध माहिती देऊन जास्तीतजास्त उत्पादन कसे घेता येईल, यावर नियमित मार्गदर्शन केले जात आहे. पिकांवरील कीड आणि रोगांचे व्यवस्थापन, कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेतले जाईल, यावर वेळोवेळी शेतकऱ्यांच्या कृषी विभागाकडून शेतात जाऊन सतत मार्गदर्शन केले जात आहे.
- रवींद्र लांजेवार, तालुका कृषी अधिकारी सडक अर्जुनी.
